कुटिरोद्योग व स्वयंसाहाय्यता गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्याच जोडीला आता वनवासी परिसरातील महिलांनीही परंपरागत स्वरूपातील छोटेखानी उद्योग सुरु केला आहे. स्वयंरोजगारांद्वारे ग्रामीण व वनवासी क्षेत्रातील महिलांनी, आत्मविश्वासपूर्ण सक्षमीकरणाच्या जोडीलाच आपले स्वतःचे, छोटेखानी असले तरी स्वतःचे असे व्यावसायिक-आर्थिक विश्व साकारले असून, त्याचीच ही यशोगाथा...
परंपरागतरित्या पाहता, ग्रामीण क्षेत्राप्रमाणेच भारतातील वनवासी क्षेत्रातील मुली व महिलांमध्ये कल्पकता, नाविन्यता, क्षमता, कौशल्य, मेहनतीपणा व जिद्द इ. गुण आवर्जून आढळतात. अर्थात, त्याचवेळी हे वास्तव प्रकर्षाने जाणवते की, वनवासी महिलांना त्यांच्याजवळ असणार्या या विशेष गुण-कौशल्यांची पुरेशी जाणीवच नसते.
असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या वनवासी क्षेत्रात त्यांचे भौगोलिक स्वरूप व दुर्गमता यामुळे शिक्षण, आरोग्य सुविधा, परस्पर संपर्क-संवाद या बाबी अगदीच जुजबी स्वरूपात उपलब्ध असतात. बहुसंख्य ठिकाणी तर या बाबींची वानवाच असते. यातील मूळ व मुलभूत मुद्दा म्हणजे, शिक्षणाचा. मर्यादित वा नगण्य स्वरूपातील शिक्षणामुळे ग्रामीण व वनवासी या उभयक्षेत्रांतील मुली आणि महिलांच्या विकासाची सुरुवात होतच नाही अथवा काही सुरुवात झालीच, तर ती नेहमी मर्यादित स्वरुपातीलच असायची.
अर्थात, वनवासी क्षेत्रातील पुढच्या पिढीतील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी तेथील वनवासी शाळांमधील शिक्षणाला गुणात्मक दर्जाची जोड देण्याचे प्रयत्न निश्चितपणे होत आहेत. याचा मुख्य भर हा वनवासी भागातील विशेषतः शिक्षित मुलींना त्यांच्या औपचारिक शिक्षणाच्या जोडीलाच त्यांच्यातील कला-कौशल्याला वाव देतानाच, अशा कौशल्यप्राप्त वनवासी विद्यार्थिनींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन दिले जाते. याचे अपेक्षित परिणामसुद्धा दिसू लागले आहेत.
यासंदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणून झारखंड या वनवासीबहुल राज्यातील ‘झारखंड राज्य जीवनस्तर विकास संस्थे’च्या जोन्हा येथील ‘आशान फाऊंडेशन’च्या प्रयत्नांचा आणि उपक्रमाचा उल्लेख करावा लागेल. संस्थेतर्फे प्रामुख्याने वनवासी मुली आणि महिलांना तिथे स्वयंरोजगारांचे यशस्वी धडे दिले जातात.
‘झारखंड राज्य जीवनस्तर विकास संस्थे’तर्फे प्रकाशित केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या संस्थेच्या प्रयत्नांतून स्वतःचा छोटा व्यवसाय करणार्या 2 हजार, 500 पेक्षा अधिक वनवासी महिला त्यांच्या परंपरागत व कुटिरोद्योगातून लखपती बनल्या आहेत. मुख्य म्हणजे, या महिलांनी घरच्याघरी व गावात राहूनच हे सारे साध्य केले आहे.
‘जीवनस्तर विकास संस्थे’ने झारखंडमध्ये वनवासी महिलांच्या विकासार्थ चालविलेल्या दुसर्या टप्प्यात खास वनवासी विद्यार्थिनींसाठी व्यवसाय शिक्षणासह कौशल्यविकास उपक्रमाला प्राधान्य दिले आहे. यामध्ये या महिलांना त्यांच्या कुटिरोद्योगातून आर्थिक लाभ मिळण्याच्या जोडीलाच त्यांच्याशी संबंधित व फायदेशीर ठरू शकतील, अशा ग्रामीण व वनवासी भागातील कुटिरोद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. यामध्ये कृषी, परंपरागत, कलाकुसर व त्याशिवाय ग्रामीण संदर्भातील मूलभूत तंत्रज्ञानावर आधारित कुटिरोद्योग इ.चा आवर्जून समावेश करण्यात आला आहे.
वनवासी महिलांना गृहोद्योगाद्वारे सक्षमीकरणाचा मार्ग दाखविणार्या या यशस्वी प्रयत्नांमुळे ग्रामीण व वनवासी क्षेत्राला नवी दिशा देण्याचे महत्कर्म यशस्वीपणे करून राखविले आहे. यातून वनवासी भागातील, विशेषतः त्या भागातील वनवासी पालकांना आता खात्री पटली आहे की, मूलभूत शिक्षणाला कौशल्यविकास व प्रशिक्षणाची जोड दिल्यास, या मुली यशस्वी लघु-उद्योजक तर होतातच, त्याशिवाय त्या घराला आर्थिक मदत करतानाच स्वावलंबीसुध्दा होतात.
झारखंडच्या जोन्हा परिसरातील प्रियंका मुंडा व आरती मुंडा या वनवासी भगिनींची यशोगाथा प्रेरक, मार्गदर्शक ठरते. आपले प्रयत्न आणि जिद्द यांआधारे आपापल्या परिसरातच कुटिरोद्योगाला यशस्वी प्रस्थापित केल्याबद्दल या वनवासी मुलींची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. यांपैकी प्रियंका मुंडाला ‘यंग लीडर्स फॉर अॅक्टिव्ह सिटिझनशिप’ची फेलोशिप, तर आरती मुंडाला ‘रिलायन्स फाऊंडेशन’तर्फे अमेरिकेच्या ‘व्हायटेल व्हॉईसेस’ची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या फेलोशिपमुळे देशातील वनवासी तरुणींच्या उद्यमी प्रयत्नांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर तर घेण्यात आलीच, त्याशिवाय त्यांच्यासारख्या झारखंडमधील इतर वनवासी तरुणींना स्ववळावर स्वतःचा कुटिरद्योग सुरू करण्याची महती प्रेरणा मिळाली, हे विशेष.
याचाच परिणाम म्हणून आज आपल्याकडील वनवासी मुली वनक्षेत्रातील पानांच्या द्रोणांपासून अभियांत्रिकी व तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन बनविण्यामध्ये सहभागी होत आहेत. याशिवाय, विशेषतः ग्रामीण क्षेत्राला कायमस्वरूपी भेडसावणार्या अन्य सुरक्षा, पर्यावरण, संरक्षण इ. क्षेत्रांत काम करतानाच वन आणि वनवासींचा विकास करण्याचे काम करून इतरांसह त्यांच्या समाजाला व्यावसायिक आत्मविश्वासासह यशस्वीपणे वनाधारित कुटिरोद्योग केले जाऊ शकतात, याचा वस्तुपाठसुध्दा दिला आहे.
धोरणात्मक निर्णयाच्या स्वरूपात आता शासकीय स्तरावर व विशेषतः वनवासी क्षेत्रात उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांना लघु उद्योग वा व्यावसायिकच नव्हे, तर आर्थिक-सामाजिकदृष्ट्या ‘आत्मनिर्भर’ बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये उद्योजकतेसाठी आवश्यक असे कर्ज व आर्थिक साहाय्य, विक्री व्यवस्था लघु उद्योजकतेसाठी आवश्यक व्यवस्थापन प्रशिक्षण इ.चा प्रामुख्याने समावेश आहे.
यातून वनवासी महिलांना घरीच नव्हे, तर गाव आणि समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
यातूनच ग्रामीण आणि वनवासी या दोन्ही दुर्मीळ क्षेत्रांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत लक्षणीय स्वरूपाचे बदल होत आहेत. वनवासी उद्योजकतेतून साध्य झालेल्या या बदलांमुळे विशेषतः आजवर वनवासी क्षेत्रात महिलांच्या सुप्त उद्योजक गुणांना यामुळे उजाळा तर मिळालाच, त्याशिवाय त्यांच्या प्रयत्नातून साध्य झालेल्या आर्थिक उलाढाल व कुटुंबात उत्पन्नवाढीसाठी सबळ प्रयत्न झाल्याने वनवासी महिला आर्थिक-सामाजिक या दोन्हीदृष्ट्या सक्षम आणि सबळ होण्याचा मोठा फायदा झाला आहे. याचे प्रत्यंतर म्हणून वनक्षेत्र वा गाव पातळीवर महिलांना उंबर्यापासून चावडीपर्यंत त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या रूपाने मान आणि मान्यता मिळू लागली आहे. घरच्या हिशोबापासून ग्राम महिला मंडळ वा महिला बचतगटाच्या व्यवहार वा उलाढालीपर्यंतची कामे या ग्रामीण महिला नेटके आणि नेमकेपणे करू लागल्या आहेत. त्यांची दखल सर्वत्र घेतली जात आहे. यातून त्यांना सर्व व्यवहारांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी मिळू लागली आहे.
अशाप्रकारे झारखंडसारख्या राज्याच्या दुर्गम व वनवासी विभागात तेथील मुली आणि महिलांनी परंपरागत चाकोरीपलीकडे जाऊन शासन-प्रशासनाच्या सहकार्याने, विकास विभागाच्या मार्गदर्शनाने व मुख्य म्हणजे, स्वतःची जिद्द व प्रयत्नांद्वारा वनावर आधारित कुटिरोद्योगांच्या माध्यमातून आपल्या कौटुंबिक-आर्थिक विकासासह ग्रामीण उद्योजकतेतून अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे.
देशपातळीवर लघु उद्योगांना प्रोत्साहनपर चालना मिळतानाच ‘झारखंड जीवन विकास प्रकल्पा’ने आपल्या यशस्वी वाटचालीतून महिलांची क्षमता, कार्यक्षमता व सबलतेची ग्रामीण व महिला लघुउद्योजकांना सहभागी करण्याचे खात्री करून देऊन या ग्रामोद्योगी विकास योजनेत ग्रामीण व महिला लघुउद्योजकांना सहभागी करण्याची एक अनुकरणीय वाटचाल सुरू ठेवली आहे.
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
9822847886