नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीस (एनटीए) २०२४ सालच्या वैद्यकीय पदवी परिक्षा (नीट - युजी) दिलेल्या सर्व २३ लाख उमेदवारांनी मिळवलेले गुण प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे. ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला.
न्यायालयाने २०२४ सालच्या ‘नीट’ युजीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले गुण आपल्या संकेतस्थळावर सार्वजनिक करण्याचे निर्देश एनटीएला दिले आहेत. संकेतस्थळावर गुण सार्वजनिक करताना विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात यावी. एनटीएने २० जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत केंद्रवार निकाल सार्वजनिक करावेत, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. ‘नीट’ युजीची प्रश्नपत्रिका फुटणे ही बाब प्रथमदर्शनी मोठ्या प्रमाणात झाली नसून ती मर्यादित असल्याचे दिसते, अशी विशेष टिप्पणी न्यायालयाने केली.
अशाप्रकारे मर्यादित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी फेरपरिक्षेचा आदेश देण्याविषयी शंका वाटते. प्राप्त पुरावे आणि घटनाक्रम पाहता प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर झाला नसून तो केवळ पाटणा आणि हजारीबाग या दोन शहरांपुरताच मर्यादित असल्याचे दिसते, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. केंद्र सरकारतर्फे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. प्रश्नपत्रिकेची गळती ५ मे रोजी म्हणजेच परिक्षेच्या दिवशी सकाळी ८ वाजेनंतर झाली असून ती मर्यादित स्वरुपाकत होती, असे त्यांनी न्यायालयास सांगितले आहे.
सीबीआयकडून चार जणांना अटक
प्रश्नपत्रिका फुटप्रकरणी सीबीआयने बुधवारी पाटणा एम्सच्या चार वैद्यकीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी तिघांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. या चौघांचे लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.