नवी दिल्ली : अंमली पदार्थांची तस्करी नार्को टेररशी जोडली गेली आहे. अंमली पदार्थांपासून मिळणारा पैसा हा देशाच्या सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोका बनला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचे उद्दिष्ट केवळ अंमली पदार्थ आणि व्यक्तींना पकडणे नसून संपूर्ण जाळे नष्ट करण्याचे उद्दिष्ट असावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केले आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी विज्ञान भवन येथे नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या (एनकॉर्ड) च्या सातव्या उच्चस्तरीय बैठकीस संबोधित केले. यावेळी त्यांनी नॅशनल नार्कोटिक्स हेल्पलाइन ‘मानस’चा प्रारंभ करून श्रीनगरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) च्या झोन कार्यालयाचे उद्घाटन केले.
या बैठकीला संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले की, अंमली पदार्थांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यामुळे भावी पिढी उध्वस्त होते. आता हा संपूर्ण व्यवसाय नार्को टेररशी जोडला गेला आहे आणि देशाच्या सुरक्षेला सर्वात गंभीर धोका अंमली पदार्थांच्या तस्करीमधून कमावलेला पैसा बनला आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे आपली अर्थव्यवस्था पोकळ करण्यासाठी आर्थिक व्यवहारांचे मार्गही मजबूत झाले आहेत.
अशा अनेक संघटना तयार झाल्या आहेत ज्या केवळ औषधांची विक्रीच करत नाहीत तर अवैध हवाला आणि करचोरीही करतात. अंमली पदार्थांची तस्करी हा आता बहुस्तरीय गुन्हा बनला आहे, ज्याचा कठोरपणे सामना केला पाहिजे, असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.