ट्रम्प यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एका माणसाचा माथेफिरूपणा होता की त्यामागे सखोल कट होता, हे यथावकाश कळेल. गेल्या तीन-चार वर्षांत ज्यांनी ज्यांनी आपल्या देशात राष्ट्रवाद जागविला, त्या सर्व नेत्यांवर हल्ले झाले आहेत. यामागे जगभरातील राष्ट्रवादी नेत्यांना लक्ष्य करण्याचा व्यापक कट शिजतो आहे का, असाच प्रश्न उपस्थित होतो.
जगभर राष्ट्रवादी नेत्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत आणि निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी विचारसरणीच्या पक्षांना पराभूत करण्याचे निकराचे प्रयत्न केले जात आहेत. युरोपमध्ये गेल्या काही वर्षांत उजव्या किंवा राष्ट्रवादी विचारसरणीच्या पक्षांना वाढता पाठिंबा मिळताना दिसतो. इटलीत तर दुसर्या महायुद्धानंतर प्रथमच एका उजव्या विचारसरणीच्या नेत्या पंतप्रधानपदावर बसल्या आहेत. फ्रान्समध्ये ली मारी पेन यांच्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाने बहुमताच्या जवळपास मते मिळविली होती, पण निवडणुकीच्या पुढील फेरीत डाव्या पक्षांनी जोर लावून त्यांना सत्तेपासून वंचित ठेवले. एकंदरीतच राष्ट्रवादी विचारांना जनतेत वाढता पाठिंबा मिळत आहे.
भारताचा विचार केल्यास, भारतीय मतदारांनी सलग तिसर्यांदा राष्ट्रवादी विचारांच्या आघाडीला म्हणजे एनडीएला सत्तेवर बसविले आहे. यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत डाव्या, उदारमतवादी जागतिक इकोसिस्टीमने भाजपप्रणित एनडीएला पराभूत करण्यासाठी मतदारांमध्ये भ्रामक विचार पसरविले होते. खोटेपणा आणि चुकीच्या ‘नॅरेटिव्ह’ने काही प्रमाणात मतदारांची दिशाभूलही केली. पण भारतीयांमध्ये राष्ट्रवादाचा अंतःप्रवाह जागता राहिल्याने अखेरीस नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदावर विराजमान झाले.
काही वर्षांपूर्वी पाटण्यातील गांधी मैदानावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचारसभेत बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर 2018 साली पंजाबमधील निवडणुकीच्या प्रचारसभेला जाताना पंजाबातील एका पुलावर त्यांच्या मोटारींचा ताफा अडविण्यात आला आणि काही समाजकंटक त्यांच्या मोटारीजवळ आले होते. पण, सुरक्षायंत्रणेने तेव्हा प्रसंगावधान राखून त्या परिस्थितीतून मोदी यांना बाहेर काढले. मोदी यांच्याविरोधात पद्धतशीरपणे गैरसमज पसरविण्याचे काम जगभर चालत असते आणि त्यात कधीकधी डाव्या इकोसिस्टीमला यशही येते. तरीही मोदी यांच्या पुरोगामी आणि निर्णायक कारभाराने भारताच्या विकासाचा विजयरथ चार अंगुळे वरच दौडत असल्याने मोदीविरोधकांना अखेरीस हात चोळीत बसावे लागते.
आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी म्हटले आहे की, “भारतातील राष्ट्रवादी विचारांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.” भारतात मोदी यांच्या सरकारविरोधात निर्माण करण्यात येणार्या वादांमागे मोदी यांना नामोहरम करणे हाच हेतू असतो. मोदी यांच्यावर प्रत्यक्ष हल्ला जरी झाला नसला, तरी विरोधकांच्या अनेक वक्तव्यांतून मोदी यांच्या मृत्यूची कामना केली जाते. ‘मोदी तेरी कबर खुदेगी’सारख्या घोषणा असो, की ‘मोदी हिटलर हैं, हिटलर की मौत मरेगा’, ‘मोदी कुत्ते की मौत मरेगा’ यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांच्या विधानांतून मोदी यांच्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत, ते स्पष्ट होते. राहुल गांधी यांनीही ‘मोदी यांना देशातील तरुण लाठ्याकाठ्यांनी मारहाण करतील,’ असे विधान केले होते. त्यांच्या मातेने पूर्वी मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हटलेच होते. गुजरात पोलिसांच्या एन्काऊन्टरमध्ये मारली गेलेली इशरत जहाँ ही तरुण दहशतवादी मोदी यांच्या हत्येसाठीच अहमदाबादमध्ये येत होती. एकंदरीत मोदी हेही डाव्या इकोसिस्टीमच्या रडारवर आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते.
भारतासह जगभरातील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांवर का हल्ले होत आहेत, असा प्रश्न कोणालाही पडेल. यातील बहुसंख्य नेते हे उजव्या विचारसरणीपेक्षा राष्ट्रवादी विचारांचे आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्यादृष्टीने त्यांच्या देशाचा विकास आणि त्यांच्या देशातील भूमिपुत्रांना विकासाच्या संधी मिळणे गरजेचे आहे. गेल्या काही दशकांमध्ये मध्य-पूर्वेतील आणि आफ्रिकेतील सशस्त्र संघर्षामुळे लाखो लोक निर्वासित बनले असून ते सुरक्षित राहण्यासाठी युरोपीय देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी धडपडताना दिसतात. अनेक युरोपीय देशांनी मानवतेच्या भावनेतून आपल्या देशात हजारो निर्वासितांना वसविले होते. पण, जसा काळ गेला, तसा या निर्वासितांनी या देशाच्या मूळ नागरिकांना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला.
हे सर्व निर्वासित मुस्लीम आहेत आणि एकदा आपले जीवन सुरक्षित झाले, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली नखे बाहेर काढली. या निर्वासितांनी आश्रयदात्या देशातील अनेक नोकर्या आणि व्यवसाय यांवर आपली पकड बसविली आहे. त्यामुळे मूळ रहिवाशांपुढे बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न उग्र झाला आहे. त्यातच या निर्वासितांनी धार्मिक कट्टरतावाद समाजात रूजविण्यास प्रारंभ केला. या सार्याचा परिणाम फ्रान्स, ब्रिटन, इटली, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि सामाजिक संघर्ष उफाळला. त्या देशांतील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी या परिस्थितीतचा अचूक फायदा उठवीत मूळ नागरिकांच्या असंतोषाला फुंकर घालून राष्ट्रवादाचा अंगार फुलविला आहे. अमेरिकेत हे वेगळ्या प्रकारे घडले.
दक्षिण अमेरिकेतील गरीब देशांतून अमेरिकेत बेकायदा घुसखोरी करणार्या नागरिकांचा प्रश्न उग्र बनला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या बेकायदा लोकांना पुन्हा परत पाठविण्याचा निश्चय केला आणि त्यांच्या कार्यकाळात मेक्सिकोच्या सरहद्दीवर मोठे कुंपण उभे राहिले. ट्रम्प यांनी जगभरतील अनेक संघर्षातून अमेरिकेचा सहभाग घटविण्याचा निर्णय घेतला आणि ‘नाटो’ संघटनेच्या सदस्य देशांकडून संरक्षणाची किंमत वसूल करण्याची मागणी केली. युक्रेनला दिली जाणारी मदत थोपविण्याचा मनसुबा ट्रम्प यांनी व्यक्त केल्यानेही खळबळ उडाली आहे.
युद्ध हा अमेरिकेतील सर्वात मोठा आणि किफायतशीर धंदा आहे. त्यात हजारो अब्ज डॉलर्स गुंतलेले आहेत. जगभर अनेक ठिकाणी छोटे वा मोठे सशस्त्र संघर्ष सुरू राहणे यातच या उद्योगाचे हितसंबंध गुंतलेले आहेत. जगातील लष्करी सामग्री बनविणार्या सर्वात मोठ्या पाच कंपन्यांमध्ये चार अमेरिकी कंपन्या आहेत. ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्याची घोषणा केली होती आणि त्यांचा धडाकेबाज स्वभाव पाहता, त्यांनी ते कदाचित प्रत्यक्षातही आणले असते. तसे झाले, तर या कंपन्यांच्या नफ्यावर त्याचा विपरित परिणाम झाला असता. यांसारखी अनेक कारणे आहेत. पुढील काळात काय घडेल, त्याची फक्त झलकच आपल्याला दिसते.
राहुल बोरगांवकर