मुंबई- आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात पोहचू लागले आहेत. त्यामुळे सध्या पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेले आहे. मात्र दुसरीकडे मात्र मुंबई-पुणे महामार्गावर वारकऱ्यांच्या खासगी बसला भीषण अपघात झाल्याची दुःखद घटना घडली. या अपघातामध्ये पाच वारकऱ्यांना आपला जीव जागीच गमवावा लागला आहे. डोंबिवलीहून एक ट्रॅव्हल बस सोमवारी रात्रीच्या सुमारास पंढरपूरला निघाली होती. पण ही बस मुंबई-पुणे महामार्गावर आल्यानंतर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 15 जुलै) रात्री एक ट्रॅव्हल बस डोंबिवलीहून पंढरपूरला निघाली होती. या बसमधून एकूण ५४ वारकरी प्रवास करत होते. डोंबिवली मधील दोन ते तीन गावामधून चार बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. त्यातील एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस २० फूट खाली कलंडली, यात बसमधले प्रवाशी जखमी झाले.
बस मधले सात प्रवाशी गंभीर जखमी असून, त्याच्यावर कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ४२ भाविक किरकोळ जखमी झाले आहेत . मंगळवारी मध्यरात्री ०१ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात तीन भाविक जागीच ठार झाले तसेच दोन ट्रॅक्टर मधले प्रवाशी मृत पावले.