ठाणे- कचरा संकलन केंद्रावर रांगा लावाव्या लागत असल्याने घंटागाडीवरील वाहन चालक आणि सफाई कामगारांना दररोज तीन तास अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्या कामाचा मोबदला दिला जात नाही. तसेच गेले ३ महिने ठेकेदाराकडुन ही छळवणूक सुरु असल्याने संतापलेल्या कामगारांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालया बाहेर ठिय्या मारला. गेल्या अनेक दिवसापासून कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू असल्याने शहरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. तेव्हा कामगारांच्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या नियमबाह्य ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी कामगारांनी केली आहे.
ठाणे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने ठेकेदार नेमले आहेत. मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा.लि. या ठेकेदाराला कचरा वाहतुकीचे काम देण्यात आले. मात्र केवळ आर्थिक लाभासाठी सबकॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येत आहे.सी.पी तलाव ते डम्पिंगपर्यंत कचरा वाहतूक करावी लागत असल्याने मध्येच वाहने बंद पडतात. याशिवाय उघड्यावर कचऱ्याची वाहतूक करण्यात येत असल्याने ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. कामगारांना नाहक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
मेट्रो वेस्ट हँडलिंग या ठेकेदारकडे कार्यरत असलेल्या सुमारे ५५ कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ कामगारांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि बालाजी ट्रान्सपोर्ट या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.