कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अतिक्रमणे वाढली आहेत. सदर बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला रविवार, दि. 14 जुलै रोजीची मुदत दिली होती. मात्र, कारवाई न झाल्याने रविवार, दि. 14 जुलै रोजी विशाळगडाकडे कूच केली होती. दरम्यान, गडावर अज्ञातांनी दगडफेक केली, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे .
हिंदुत्ववादी संघटनांच्या आवाहनानंतर पुणे आणि मुंबईतून हजारो शिवभक्त विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रवाना झाले. विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा तापला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी सकाळी ते किल्ल्यावर पोहोचण्याआधीच तिथे दगडफेक झाल्याची घटना घडली. सध्या विशाळगडावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
किल्ले विशाळगडावर कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, याबाबत प्रशासन दक्ष आहे. या पार्श्वभूमीवर विशाळगडला पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला आहे. यामुळे गडाला छावणीचे रुप आले होते. तेथे भाविक आणि पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शिवभक्त विशाळगडावर येणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू!
कोल्हापूर जिल्ह्यात किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणविरोधात हिंदूत्ववादी संघटनाकडून आंदोलन करण्यात येत आहे. तसेच, विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. मोहरम सण आणि आषाढी वारी, नंदवाळ यात्रा, सण इत्यादी साजरे होणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात दि. 15 जुलै रोजी सकाळी 6 ते दि. 29 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे ‘कलम 37 (1) अ ते फ’ आणि ‘कलम 37 (3)’ अन्वये बंदीआदेश जारी करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.
आवश्यक खबरदारी घेणार :शंभुराज देसाई
शंभुराज देसाई यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, “सध्या नेमके काय घडले आहे, याची माहिती नाही. मी तत्काळ तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकार्यांना याबाबत संपर्क करून आवश्यक त्या सूचना करीन. आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल.”
गडाखाली पुनर्वसन करण्याचा विचार
“विशाळगडावरील अतिक्रमण हे आजचे नसून अनेक वर्षांपासूनचे आहे. आमचे सरकार येण्याच्या आधीपासूनचे आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी सरकार व जिल्हा प्रशासनावर असतानाही त्याकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले, हे खरे आहे,” असे मत मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. तसेच, “हे गडकिल्ले आमच्या आस्थेचा, अभिमानाचा विषय आहे.
आमच्या ऐतिहासिक वारशाचा विषय आहे. प्रतापगडावरसुद्धा अफजल खानाच्या कबरीचे जेव्हा अतिक्रमण झाले, दि. 29 जुलै 1953 पासून हजारो शिवभक्त मागणी करायचे की, अतिक्रमण हटवले पाहिजे. पण, दुर्दैवाने तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने दि. 5 मे 2008 रोजी हे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय स्थगित झाला. या सरकारने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी एक कोटी, 17 लाख रुपयांचे हे जिल्हाधिकार्यांच्या खात्यात वर्गही केले.
आता नुकतीच एक बैठक घेतली. त्यामध्ये या विषयावर विचारविनिमय करण्यात आला. येथील अतिक्रमणधारकांना तिथून हटवून गडाच्या खाली जागा असल्यास तिथे त्यांचे पुनर्वसन करता येईल का, असाही विचार सुरू आहे. जी दगडफेक अतिक्रमणधारकांनी केली, तर पोलीस विभागाला निश्चितपणे आदेश दिला जाईल की, अशांना शोधलेच पाहिजे,” असे मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.