दिल्ली दारू घोटाळा! मनीष सिसोदिया यांचा तुरुंगवास वाढला

    15-Jul-2024
Total Views |
 manish sisodia
 
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची दिल्ली न्यायालयाने दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. सीबीआय आणि ईडीच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दि. २२ जुलैपर्यंत वाढ केली आहे. याआधीची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
 
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआय आणि ईडीने नोंदवलेल्या भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांचा जामीन अर्ज न्यायालयाने दि. ३० एप्रिल रोजी फेटाळला होता. सीबीआय आणि ईडी तसेच सिसोदिया यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. सिसोदिया यांच्यासोबतच अरविंद केजरीवाल सुद्धा सीबीआयच्या कोठडीत आहेत.
 
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याचा तपास पूर्ण केला आहे. ईडीने या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतचं या घोटाळ्यातून मिळालेला पैसा गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.