मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, आता यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. ही भेट राजकीय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राज्यातील सामाजिक आणि विकासात्मक चर्चा करण्यासाठी कधीतरी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे छगन भुजबळ आणि शरद पवारांची भेट कोणत्या कारणामुळे होत आहे, ते भुजबळ साहेब सांगतील."
हे वाचलंत का? - छगन भुजबळ पवारांच्या भेटीला! नेमकं काय घडतंय?
"भुजबळ हे महायूतीचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे महायूतीला धोका निर्माण होईल, असा कुठलाही निर्णय ते घेणार नाहीत. महायूती कशी एकत्र राहील यासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात. आम्हीदेखील शरद पवार साहेबांना अनेकदा भेटलो आहोत. त्यामुळे या भेटीमागे काहीही राजकीय कारण समजू नये," असे ते म्हणाले.
भाजपची संवाद यात्रा!
ते पुढे म्हणाले की, "२१ तारखेला पुण्यात भाजपच्या ५ हजार पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सर्व केंद्रीय मंत्री या अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात संवाद यात्रेची रुपरेषा आम्ही जाहीर करणार आहेत. केंद्र आणि राज्यातील १९ नेते ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात ही संवाद यात्रा काढणार आहेत," अशी माहितीही बावनकुळेंनी यावेळी दिली.