विधानसभा निवडणुकीआधी भाजपची राज्यस्तरीय संवाद यात्रा

चंद्रशेखर बावनकुळे; २१ जुलैला पुण्यात पाच हजार पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन

    15-Jul-2024
Total Views |

FAdanvis bawankkule
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राज्यस्तरीय संवाद यांत्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार आहे. येत्या दि. २१ जुलै रोजी पुण्यात राज्यातील पाच हजार भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असून, त्यात केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेची रूपरेषा, तसेच तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार, दि. १५ जुलै रोजी दिली.
 
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार आहोत.
 
समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार आहे. २१ जुलैच्या पुणे अधिवेशनापूर्वी १९ जुलैला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार असून, महाराष्ट्र विधानसभा पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
 
विरोधकांची भूमिका निंदनीय
आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केले नाही. मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक होती. विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधक जातीपातीचा राजकारण करत आहे हे जनतेला दिसले. चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील. महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवे आहे, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.