नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे आयोजित रॅलीमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्लोखोराने त्यांच्यावर दूर अंतरावरून गोळीबार केला. या गोळीबारात ट्रम्प यांच्या कानाला गोळी घासून गेली असून त्यांच्या कानातून रक्तस्त्राव येण्यास सुरूवात झाली.
दरम्यान, यावेळी गोळीबारात एका ट्रम्प समर्थकाचाही मृत्यू झाला असून इतर दोन जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतरच सुरक्षा दलांनी हल्लेखोराचा खात्मा केला आहे. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले असून त्यांच्या कानातून रक्त येत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, या प्राणघातक हल्ल्यानंतर ट्रम्प अजिबात घाबरले नाही तसेच, त्यांनी आपला हात वर करून समर्थकांना खंबीरपणे उभे राहण्याचे संकेत दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार, बटलर येथे मतदार आणि समर्थकांना संबोधित करत असताना हा हल्ला झाला. हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला असून ज्यात डोनाल्ड ट्रम्प स्टेजवरून एका रॅलीला संबोधित करताना दिसून येत आहेत. गोळीबार झाल्यानंतर ट्रम्प कानावर हात ठेवून व्यासपीठाखाली झुकले आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेराव घालत घटनास्थळावरून बाजूला आणले. या हल्ल्यानंतर सुमारे ५० सेकंदांनंतर ट्रम्प व्यासपीठाच्या मागून उठून हवेत हात घेऊन लोकांना संबोधित करत होते.
या घटनेनंतर ट्रम्प यांच्या वतीने निवेदन जारी करण्यात आले असून त्यांनी 'X'वर म्हटले की, “मी यूएस सीक्रेट सर्व्हिस आणि सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे झालेल्या गोळीबाराला त्वरित प्रतिसाद दिला. रॅलीत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाप्रती आणि जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाप्रती मी शोक व्यक्त करू इच्छितो. आपल्या देशात असे काही घडू शकते यावर विश्वास बसत नाही, असे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, सध्या मारल्या गेलेल्या हल्लेखोराबद्दल काहीही माहिती नाही. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली. मला लगेच लक्षात आले की काहीतरी गडबड आहे कारण मी मोठ्याने बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला आणि लगेच लक्षात आले की गोळी माझ्या कानाला स्पर्शून गेली आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आले की मला खूप रक्तस्त्राव होत आहे. देवा अमेरिकेला वाचव, असेदेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'X'वरील पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.