अंबानींच्या लग्न सोहळ्यात अज्ञात व्यक्तीची इंट्री; तपासात निमंत्रण पत्रिका नाही!
14-Jul-2024
Total Views |
मुंबई : मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लुकमान मोहम्मद शफी शेख नावाच्या व्यक्तीला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना अटक केली आहे. पेशाने व्यावसायिक असलेल्या शेखला दि. १३ जुलै रोजी पहाटे ३.४५ वाजता लग्नस्थळाच्या पहिल्या मजल्यावरून सुरक्षा तपासणीदरम्यान पकडण्यात आले आहे. या व्यक्तीने गेट क्रमांक १० मधून बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचे तपासात उघड झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लुकमानची चौकशी केली तेव्हा त्याने दिशाभूल करण्यास सुरुवात केली. तपासात त्याच्याकडे निमंत्रण पत्रिका सापडली नसून त्यानंतर त्याला सुरक्षा व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले. यादरम्यान, त्याला जिओ सेंटर सोडण्यास सांगितले असता त्याने नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, “लुकमान शेख जिओ सेंटरमध्ये संशयास्पदरीत्या फिरत होता. तपासादरम्यान, आम्हाला आढळले की त्याच्याकडे निमंत्रण पत्र नव्हते, याचा अर्थ तो एक विनानिमंत्रित पाहुणा होता, ज्यामुळे त्याला सुरक्षा एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आले होते.” लुकमान शेख हा पालघरचा रहिवासी असून त्याने गेट क्रमांक १० मधून अवैधरित्या प्रवेश केला होता. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शेखने आपण निमंत्रण न देता जिओ सेंटरमध्ये प्रवेश केल्याचे मान्य केले.