चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादाचे सावट; दहशतवाद्याच्या समर्थनार्थ रॅली!

    13-Jul-2024
Total Views |
champion trophy terrorism

 
नवी दिल्ली :       आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने ज्या ठिकाणी होणार आहेत तेथे दहशतवादी बुरहान वानीच्या समर्थनार्थ मोर्चे निघत असल्याचे समोर आले आहे. भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. दि. ०८ जुलै रोजी दहशतवाद्यांनी बदनौता गावावर हल्ला केला होता.




चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर आता सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ल्याची छाया पसरली असून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीमध्ये दहशतवादी बुरहान वानीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहेत. दहशतवादी बुरहान वानीला भारतीय लष्कराने एका चकमकीत ठार केला होता. पाकिस्तानात त्याच्या समर्थनार्थ रॅली काढली जात असून वानी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होता.

दरम्यान, पाकिस्नानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, भारताने खेळांना राजकारणापासून दूर ठेवावे. त्यानंतर आता बुरहान वानीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीम राबवली जात आहे. विशेष म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघाला पाठवले जाणार नसून, पर्यायी ठिकाण म्हणून श्रीलंका किंवा यूएईचा वापर केला जाऊ शकतो, असे बीसीसीआयने ठरवले असल्याचे बोलले जात आहे.