विधानपरिषद निवडणूकीची चुरस! कोण फुटणार? कोण जिंकणार पहा LIVE अपडेट्स

    12-Jul-2024
Total Views |
 
Shinde
 
मुंबई : विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी आज मतदान होत असून, आतापर्यंत १२९ आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यात भाजपच्या ७२ आमदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने संख्याबळ नसतानाही अतिरिक्त उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे.
 
विधानसभेतील विद्यमान आमदारांची संख्या २७४ असल्यामुळे ११ आमदारांना विजयासाठी २३ चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. भाजपने ५ उमेदवार रिंगणात उतरवले असून, त्यांना ११५ मतांची आवश्यकता आहे. अपक्ष मिळून त्यांच्याकडे ११२ मते असली, तरी उर्वरित मतांची तजवीज झाल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली. शिवसेनेचे दोन उमेदवार मैदानात आहेत. त्यांच्याकडे स्वतःची ३७ आणि अपक्ष मिळून पुरेशी मतसंख्या आहे. राष्ट्रवादीनेही दोन उमेदवार दिले आहेत. त्यांच्याकडे स्वतःची ३९ मते आहेत. ४ अपक्षांची साथ त्यांना असल्यामुळे दुसरा उमेदवार निवडून येण्यात अडचण नाही.
 
काँग्रेसकडील ३७ मते यावेळेस निर्णायक ठरणार आहेत. अतिरिक्त मते असूनही त्यांनी दुसरा उमेदवार दिलेला नाही. याचा अर्थ मतफुटीची सर्वाधिक भीती हायकमांडला आहे. २०२२ मध्ये त्यांचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाल्याने यावेळेस त्यांनी प्रज्ञा सातव यांना २३ ऐवजी २८ ते ३० मते राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरीत मते उबाठा गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना दिली जातील. उबाठाकडील १५ आणि काँग्रेसच्या उर्वरित मतांच्या आधारावर त्यांना २३ मतांचा कोटा पूर्ण करता येईल. त्यामुळे शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
हे उमेदवार रिंगणात!
 
भाजप - पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत
शिवसेना - भावना गवळी आणि कृपाल तुमाने
राष्ट्रवादी - राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे
काँग्रेस - प्रज्ञा सातव
उबाठा गट - मिलिंद नार्वेकर
शेकाप - जयंत पाटील (शरद पवार गटाचे समर्थन)
 
विधानपरिषद निवडणूक अपडेट :  भाजपच्या ९७ आणि त्यांना समर्थन दिलेल्या ९ अपक्ष आमदारांनी मतदान केले असून अद्याप भाजपच्या ७ आमदारांचे मतदान बाकी आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ११५ मतांची गरज आहे. आतापर्यंत विधानसभेच्या २७४ पैकी २२२ आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.