अत्यंत तरल, मानवी भावनांचा विलक्षण पट मांडणार्या चिंतामणी ऊर्फ मिलिंद छत्रे यांना नुकतेच पहिल्या दीपक करंदीकर स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानिमित्ताने...
मिलिंद छत्रे यांचे शिक्षण पुण्यात झाले. भारती विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यावर त्यांनी संगणक क्षेत्रातल्या ‘आयबीएम’ या आंतरराष्ट्रीय कंपनीतून कारकीर्द सुरू केली. गेली 26 वर्षे ते ‘आयबीएम’मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर संगणक तंत्रज्ञानविषयक तीन पेटंट्स जमा असून, त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण केले आहे. सध्या ते ’Generated AI’ या आधुनिक क्षेत्रात Data & AI solution Architect म्हणून काम करत आहेत.
प्रत्येकाचे आयुष्य बर्या-वाईट अनुभवांचा कोलाज असते. आयुष्यात आलेले अनुभव, अविस्मरणीय प्रसंग, मिळालेले ज्ञान आणि त्यानुरूप आपली तयार झालेली भूमिका, कुठल्या न कुठल्या प्रकारे व्यक्त करणे प्रत्येकाला आवडते. प्राचीन काळातील शिलालेख असोत, भित्तीचित्रे असोत किंवा एखाद्या भाषेत केलेले गद्य वा पद्य लिखाण, व्यक्त होणे ही आदिम मानवी संवेदन आणि मानवी स्वभावाची गरजदेखील. मिलिंद छत्रे यांना आपले संगणक क्षेत्रातील कार्य करत असतानाच, व्यक्त होण्यासाठी कवितेचे माध्यम गवसले आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
शाळा-महाविद्यालयात असल्यापासून छत्रे हास्यकविता, विडंबने लिहायचे. त्यामुळे ते मित्रांमध्ये बर्यापैकी लोकप्रियदेखील होते. पण, कविता लिहिण्यासाठी त्यांना ‘मायबोली’ या संकेतस्थळाने खरे व्यासपीठ दिले. कामानिमित्त अमेरिकेत असताना, आपल्या मातृभाषेत संवाद साधायला त्यांना फारसा वाव मिळत नव्हता. तेव्हाच ‘मायबोली.कॉम’ या संकेतस्थळाशी त्यांची ओळख झाली आणि मराठीत संवाद साधण्याची उणीव भरून निघाली. ‘मायबोली’वरील मित्र-मैत्रिणींचे प्रोत्साहन मिळाले आणि ते नियमित लिहू लागले. हळूहळू आंतरजालावर त्यांच्या विडंबनांना चांगली प्रसिद्धी मिळू लागली. वेळोवेळी ती वृत्तपत्रांतून तसेच विविध मासिकांतून प्रकाशितदेखील होऊ लागली. त्यांची ‘गारवा’, ‘खड्यांची आरती‘, ‘गड्याचे श्लोक’, पुण्याच्या ट्रॅफिकवरचे भाष्य किंवा राजकारणावरची तात्कालिक विडंबने आंतरजालावर विशेष गाजली.
‘नेमके माझ्याकडे हटकून येते
दु:ख सुद्धा माणसे पाहून येते
मी दिवसभर कोरडा असतो तसा...पण सांज ढळली की
मळभ दाटून येते’
या ओळी त्यांच्यातील काव्यप्रतिभेची साक्ष म्हणून पुरेशा आहेत.
2007 मध्ये मायबोलीवर सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांनी गझल कार्यशाळा घेतली होती. त्या कार्यशाळेत छत्रेंनी गझल लेखनाचा श्रीगणेशा केला आणि तेव्हापासून आजतागायत वैभव जोशींच्या मार्गदर्शनाखाली ते सातत्याने मराठी गझल लिहीत आहेत. त्यांनी आजवर पुण्यात आणि पुण्याबाहेरील अनेक मुशायरे व काव्य संमेलनांतून कविता आणि गझल यांचे सादरीकरण केले आहे. ‘गझल सुरेश भटांनंतर’, ‘रत्नागिरी एक्सप्रेस’चा गझल दिवाळी अंक अशा अनेक प्रातिनिधिक गझलसंग्रहांत व वेगवेगळ्या दिवाळी अंकांत त्यांच्या गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. पुढे ‘मायबोली’वरच्या गझल कार्यशाळेतून त्यांनी अनेक नवोदितांना मार्गदर्शनही केले. सातत्याने उत्तम मराठी गझललेखन केल्याबद्दल त्यांना ‘करम प्रतिष्ठान’च्या ‘गझलांजली’ आणि ‘करम’ व ‘रंगतसंगत प्रतिष्ठान’च्या स्व. दीपक करंदीकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कवितेप्रति कृतज्ञता व्यक्त करताना छत्रे म्हणतात की, “संगणक क्षेत्र अत्यंत बेभरवशाचे आहे. तिथे कायमच तुम्ही डेडलाईन्स, कामानिमित्ताने होणारा सततचा देश-विदेशांतला प्रवास, भेटीगाठी, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले काम आणि कार्यालयीन राजकारण याने गांजलेले असता. अशावेळी मनातल्या भावनांचा निचरा करण्याचा एक मार्ग कवितेने मला उपलब्ध करून दिला.” नोकरीमुळे त्यांना विविध देशांमध्ये प्रवास करायची संधी मिळाली, विविध संस्कृतीतून आलेल्या लोकांशी संवाद साधता आला. नोकरीविश्वातले विविधरंगी अनुभव त्यांना काव्यलेखनातही उपयोगी पडलेच. पण, कवितेमुळे त्यांना चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यासाठी मानसिक बळही मिळाले. या अशा परस्परपूरक देवाणघेवाणीमुळे आयुष्य खर्या अर्थाने समृद्ध झाले, असे ते मानतात. कविता ही आता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक अविभाज्य अंग बनली आहे. कवितेने त्यांना जगातल्या समस्त पैलूंकडे बघायची व्यापक दृष्टी तर दिलीच, पण एक वेगळी ओळखही प्रदान केली.
तलखी मनाची भर दुपारी थांबली
आला अचानक शेर वळिवासारखा
अरे या कोणत्या दुनियेत नेले
आज कवितेने
जिथे निवडुंगही अष्टौप्रहर गंधाळतो आहे
याच कृतज्ञ भावनेतून त्यांचा काव्यप्रवास सुरू आहे आणि पुढेही असाच सुरू राहील. यापुढे कवितेचे वेगवेगळे प्रकारही लिहून पाहण्याची त्यांची इच्छा आहे. लवकरच स्वत:चा गझलसंग्रह प्रकाशित करण्याचेही विचाराधीन आहे. जिथे भावभावनांना महत्त्व आहे, असे कवितेचे क्षेत्र आणि जिथे बुद्धीचा कस लागतो, असे संगणक क्षेत्र अशा दोन विभिन्न क्षेत्रांत गेली कित्येक वर्षे मिलिंद छत्रे मनापासून रमलेले आहेत. मित्र परिवारात ’मिल्या’ या प्रेमळ नावाने परिचित या संगणक तंत्रज्ञान ते कविता असा भन्नाट प्रवास सुरू असलेल्या या प्रतिभावंताची वाटचाल अशीच पुढेही सुरू राहो, यासाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.
(अधिक माहितीसाठी संपर्क - 9970175018)
अतुल तांदळीकर