योग म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सहज उभी राहतात ती आसनेच. मात्र शारिरीक बळकटीपेक्षाही काहितरी अधिक योगसाधनेतून प्राप्त करता येते. ते म्हणजे ‘स्व’चे अध्ययन योेगसाधनेतून स्वाध्याय कसा साधावा हे या लेखातून जाणून घेऊया.
आपण या आधीच्या लेखांमध्ये बघितले की, फक्त शरीरापुरते आसन, प्राणायाम करणे म्हणजे योग नव्हे. स्वत: मी कोण? ही ओळख करून ती अनुभवणे म्हणजे योग करणे. शरीर हे साधन आहे, ते स्वस्थ ठेवण्यास योगासने, मन ही शक्ती आहे, ती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्राणायाम व मी कोण? हे जाणून घेण्यासाठी ’ध्यान’ असा संपूर्ण अभ्यास म्हणजे ’योग’.
त्यातील मी कोण? हे जाणून घेण्यासाठी योगशास्त्राच्या अष्टांगांपैकी दुसरे अंग नियम व नियमातील चौथा नियम म्हणजे स्वाध्याय जाणून घेण्यासाठी हा ऊहापोह.
स्वाध्याय म्हणजे स्व अध्ययन असे म्हणता येईल.
(श्रीमद्भागवत एकादश स्कंध श्रीभगवानुवाच टिकायां:)
स्व म्हणिजे आत्मा जाण।
ते ठायी नित्य अनुसंधान।
तो स्वाध्याय म्हणती सज्ञान।
ज्ञान विचक्षण निज द्रष्टे॥
333/17- एकनाथी भागवत.
अर्थ: स्व म्हणजे आत्मा हे लक्षात ठेव. त्याचेच नित्य अनुसंधान (सातत्याने स्मरण) ठेवणे, यालाच सुज्ञ ज्ञानविचक्षण व निजद्रष्टे लोक स्वाध्याय असे म्हणतात.
अनुसंधान= मी कोण? चा निश्चित संकल्प
त्यासाठी भगवंताचे म्हणणे समजून घेऊया, ते असे:
मी ह्रदयस्थ समर्थ हृदयीं।
त्या मज जीवू मागे जे कंहीं।
पुरवीं सर्वही ईश्वरत्वे ॥
151/16- एकनाथी भागवत.
अर्थ: मी सर्व समर्थ असून, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये हृदयस्थ होऊन राहत असतो. त्या माझ्याजवळ जीव जें जें कांहीं मागेल, तें तें त्याला नाही असे मी कधीच म्हणत नाही. प्रभुत्वाच्या नात्याने सर्वं काही पुरवितो.
स्वाध्यायाचा यापेक्षा स्पष्ट अर्थ काय असू शकतो? मी कोण हा बोध अनुसंधानाच्या अनुषंगाने जाणणे, म्हणजे खरा स्वाध्याय.
नुसती पोपटपंची करणे, भारंभार ग्रंथ किंवा पुस्तके वाचून आपला शिक्षितपणा वाढविणे म्हणजे स्वाध्याय नव्हे, तर ते वाचलेलं अनुभवणे, तसा संस्कार मनावर बिंबवून सु-शिक्षित होणे, म्हणजे स्वाध्याय होय. ज्याला सेल्फ लर्निंग असे, पण म्हणता येईल.
म्हणूनच म्हटले आहे, एक तरी ओवी अनुभवावी, नुसती वाचावी असे म्हटले नाही. नाहीतर पारायणरूपी पोपटपंची करून, किती जण सु-शिक्षित झाले? प्रासादिक ग्रंथ त्यास अपवाद असतीलही. पण, जोपर्यंत वाचलेलं विहारात म्हणजे, दैनंदिन कर्मात उतरत नाही, तोपर्यंत संस्कार नाही, व संस्कार नाही तोपर्यंत माणूस सुशिक्षित बनत नाही.
त्यासाठी इतर मान्य ग्रंथांसोबतच जीवन कसे जगावे? हे समजून घेण्यासाठी श्री रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध, मी कोण? चा निश्चित संकल्प जाणून घेण्यासाठी संत एकनाथांनी लिहिलेले एकनाथी भागवत, व श्रीमद्भगवद्गीता समजून घेण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी रचलेली श्री ज्ञानेश्वरी, अभ्यासणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील संतांचा हा अमूल्य ठेवा न अभ्यासता, जीवन संपविणारा महाराष्ट्रीय माणूस हा करंटाच म्हणावा लागेल.
भगवद्गीतेत स्वाध्यायालाच तप म्हणतात:
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते॥ श्रीमद्भगवद्गीता अध्याय 17 श्लोक 15
अर्थ : जे दुसर्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते, ते तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास, हेच वाणीचे तप म्हटले जाते.
स्वाध्याय करण्यासाठी आपल्या दैनंदिन वेळेतील कमीतकमी एक तास, स्वतःसाठी निर्धार करून दिवस घालवावा म्हणजे शनै शनै स्वाध्याय घडतो.
डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ व
समुपदेशक आहेत.)
9730014665