मुंबईत पावसाची संततधार सुरूच; पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता!

    30-Jun-2024
Total Views |
mumbai city monsoon updates
 

मुंबई :       राज्यात दमदार पावसाला सुरूवात झाली असून कोकण प्रदेशाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई महानगर प्रदेशात पावसाची संततधार सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात ढगाळ वातावरण असून पुण्यात देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.




तसेच, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने दमदार पावसाची आशा सर्वसामान्यांना लागली आहे.

राज्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरू असून मागील तीन दिवसांपासून मुंबईतही पावसाला चांगली सुरूवात झाली आहे. यातच आता मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून दि. ०१ जुलै रोजी मुंबईसाठी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असला तरी आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती मिळत आहे.