"आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक, ठाकरे अपवाद नाहीत!"
प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया
03-Jun-2024
Total Views |
मुंबई : आचारसंहितेचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. उद्धव ठाकरे कायद्याला अपवाद ठरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी दिली आहे. मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
प्रविण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "कायदा हा सर्वांसाठी समान असतो. उद्धव ठाकरे कायद्याला अपवाद ठरू शकत नाही. निवडणुकीच्या दिवशीची आचारसंहिता कडक असते. आचारसंहितेचे पालन करणे हे पक्षाला, पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बंधनकारक असते. निवडणूक यंत्रणा प्रभावित करणे, त्यांच्यावर टीका करणे आणि मतदानावर प्रभावित होणारी वक्तव्य ही आचारसंहितेचा भंग करते. त्यामुळे आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने योग्य असा निर्णय घेतलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात सर्वांना समान न्याय दिला आहे. त्यामुळे आयोगाच्या कार्यवाहीचे आम्ही स्वागत करतो," असे ते म्हणाले.
संजय राऊतांनी निवडणूक आयोगाबाबत केलेल्या विधानावर ते म्हणाले की, "आमच्या कुठल्या शाखा आहेत याच्या भानगडीत पडण्यापेक्षा शिवसेनेच्या रोज बंद होतं असलेल्या शाखांची संजय राऊतांनी काळजी घ्यावी. कधीकाळी शिवसेनेच्या शाखाही न्यायमंदिरे होती. आज त्या सर्व शाखांना टाळं लागलेलं आहे. अर्ध्या शाखा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यात याची चिंता करावी. दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा आपल्या घरात काय चालले आहे हे राऊतांनी पाहावे," असा टोला त्यांनी लगावला.
"जर तक्रारीत सत्य आणि तथ्य नसेल तर ती तक्रार गांभीर्याने घेतली जात नाही. परंतू, तक्रारीत जर तथ्य असेल तर शंभर टक्के निवडणूक आयोग त्याची दखल घेतो, कुठल्याही यंत्रणा दखल घेतात. निवडणूक आयोग सक्षम यंत्रणा आहे. त्यांच्या तक्रारीत सत्यता किती आहे हे तपासण्याची गरज आहे. आपल्याकडे एखाद्या यंत्रणेने न्याय दिला नाही तर कोर्ट, सुप्रीम कोर्ट आहे. परंतू, त्यांना न्यायाची अपेक्षा नाही. केवळ ढोल वाजवायचे आणि भाजपा, सत्ताधाऱ्यांवर टीका करायची हा त्यांचा नियमित कार्यक्रम आहे," अशी टीकाही त्यांनी केली.