NEET पेपर लीक प्रकरणात CBI च्या कारवाईला वेग; बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटकमध्ये छापेमारी

    28-Jun-2024
Total Views |
 cbi
 
नवी दिल्ली : NEET पेपर लीक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या कारवाईला वेग आला आहे. सीबीआयच्या रडारवर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्यातील पेपर लीक प्रकरणातील सहभागींच्या शोधात आहे. NEET मध्ये फसवणुकीचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सारनाथ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. या वेळी फसवणुकीप्रकरणी या ३३ आरोपींची चौकशी करून सीबीआय सॉल्व्हर टोळीच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
पटना येथील ज्युली कुमारी, आयएमएस बीएचयू च्या दंत विज्ञान विद्याशाखेची बीडीएस विद्यार्थिनी हिला दि. १२ सप्टेंबर २०२१ रोजी NEET परीक्षेदरम्यान सारनाथ येथील केंद्रातून अटक करण्यात आली होती. ती त्रिपुरातील रहिवासी हिना बिस्वासच्या जागी परीक्षेला बसली होती. याप्रकरणात चौकशी केल्यानंतर ४८ आरोपींची नावे समोर आली होती. दि. २२ एप्रिल २०२४ रोजी आरओ/एआरओ (प्राथमिक) परीक्षा-२०२३ चा पेपर लीक केल्याच्या आरोपावरून मिर्झापूरच्या चुनार पोलीस स्टेशनच्या कैलाहाट येथील मुख्य आर्किटेक्ट डॉ. शरद सिंग पटेल यांना एसटीएफ ने अटक केली होती.
 
हरियाणातील डॉ. शरद आणि त्यांचे सहकारी रवी अत्री यांच्यावर यापूर्वीही वैद्यकीय प्रवेश परीक्षेत हेराफेरी केल्याचा आरोप आहे. कोर्टाच्या परवानगीने सीबीआय लवकरच डॉ.शरद आणि रवी यांची चौकशी करू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या देशात NEET पेपर लीकचे प्रकरण चांगलेच तापलेले आहे.