मुंबई : पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर निवेदन केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पहिल्यांदा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा ३०४ ए होता. परंतू, त्यानंतर वरिष्ठांनी भेट दिल्यावर त्यांनी ३०४ गुन्हा दाखल करायला सांगितला. त्यामुळे त्याच दिवशी केस डायरीमध्ये ३०४ चा गुन्हा दाखल केला आणि बाल न्याय हक्क मंडळापुढे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला प्रौढ म्हणून वागणूक देण्यात यावी, असा अर्ज दिला. त्यानंतर बाल न्याय हक्क मंडळाच्या सदस्यांन तो अर्ज स्विकारला. त्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर बाल न्याय मंडळाने आरोपीला कस्टडी दिली."
त्यानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात काहीतरी गडबड असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डॉक्टरांना अटक केली आणि त्यातल्या एकाने यासाठी ३ लाख रुपये घेतल्याचं कबूल केलं. अपघातावेळी गाडीची स्पीड ११० किलोमीटर प्रति तास एवढी असल्याचे पुढे आले. याप्रकरणाचे सगळे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणात पुराव्यांची कुठलीही कमतरता नाही. याशिवाय आरोपीच्या वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुणे भागात जवळपास ७० पब्सवर कारवाई केलेली आहे. लायसन्सच्या अटीशर्तींचं उल्लंघन केलेल्या पब्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत," असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर वडेट्टीवारांनी पुण्याचा उडता पंजाब असा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "हिट अँड रनमध्ये महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिलेला नाही. पुण्याचं आता उडता पंजाब होतोय. पुण्याची वाईट अवस्था झाली आहे. शैक्षणिक हब म्हणून पुण्याची ओळख आहे. ही कार सहा महिने पुण्यात विना नंबरने फिरत होती. ती पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही? या गुन्ह्यातील कारवाईला उशीर होणं यात राजकीय कारण असून ते पुढे यायला हवं. ससून रुग्णालय ड्रग्ज विकण्याचा अड्डा बनला आहे. त्याठिकाणी ४५० हॉटेल आहे. या प्रत्येक हॉटेलकडून ५ लाख रुपयांचा हप्ता घेतला जातो. पुण्यातील हा प्रश्न गंभीर आहे. याबाबत सखोल चौकशी व्हायला हवी," अशी मागणी त्यांनी केली. तसेच आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबाला पोलिस आयुक्त जबाबदार आहेत. त्यांचा राजीनामा घेणार का? आणि आजपर्यंत या पब्सवर कारवाई न करण्याचं कारण काय? असा प्रश्नही वडेट्टीवारांनी उपस्थित केला.
यावर फडणवीस म्हणाले की, "पुणे हे सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेरघर आहे. त्यामुळे पुण्याला उडता पंजाब वगैरे म्हणून बदनाम करणं योग्य नाही. जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांनी अतिशय सक्रीय भूमिका घेतली. त्याच्यावर कारवाई व्हावी असं एकही चिन्ह नाही. पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पण विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली ती सत्य मानून त्यावरही चौकशी केली जाईल. आरोपीने पोर्शे कारचं रजिस्ट्रेशन केलं पण पुढची प्रक्रिया केली नाही. त्यामुळे यावरही कारवाई करण्यात आली आहे," अशी माहिती त्यांनी दिली.