शेतकरी, माता भगिनी, युवा, उद्योजकांना...; चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
28-Jun-2024
Total Views |
मुंबई : शेतकरी, माता भगिनी, युवा, उद्योजकांना ताकद देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर आता बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्राचा पोशिंदा असलेल्या माझ्या बळीराजाला आर्थिक व मानसिक ताकद देण्याच्या निर्धारासह वारकरी संप्रदाय, महिला, युवती, युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, विवाहिता, विधवा, दिव्यांग, वृद्ध, सैनिक, पोलीस, नोकरदार, उद्योजक अशा समाजातील सर्वच घटकांना आजच्या अर्थसंकल्पातून भरीव मदत, अनुदान व न्याय देण्यात आला आहे," असे म्हणत त्यांनी महायूती सरकारचे अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले की, "कृषीपंपावरील वीज बिल माफीची महत्वाकांक्षी घोषणा करून राज्यातील ४७ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा करण्यात आली असून आता २१ ते ६० वर्षाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. यासाठी ४६,००० कोटी रुपये महायुती सरकारने राखून ठेवले आहेत. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून माता भगिनींना वर्षाला ३ सिलिंडर देण्याचा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण पाऊल आहे."
"सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीजेसह सिंचन, जलयुक्त शिवार योजनेतून हिरवीगार शेती, नवे रोजगार, लघु उद्योगाला प्रोत्साहन, तीर्थक्षेत्र विकास, भरीव ऊर्जा निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालये हे सगळेच राज्याला गतिमान प्रगतीकडे वाटचाल करणारे आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आज सादर झालेला अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याच्या विकासाची बीजे मजबूत करणारा तर आहेच, शिवाय संशोधन, आरोग्य, कृषी, आदिवासी या सर्व विकासावर भर दिला आहे, असेही ते म्हणाले.