भारतीयांवर नस्लभेदी टिप्पणी करणारे सॅम पित्रोदा पुन्हा ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष; भाजपची काँग्रेसवर टीका

    27-Jun-2024
Total Views |
rahul gandhi
 
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सॅम पित्रोदा यांना आपल्या परदेशी शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, त्यांच्या विधानांनी देशात नव्या वादाला तोंड फुटले होते, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा ते 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस'चे अध्यक्ष झाले आहेत. ही घोषणा बुधवार,दि. २६ जून २०२४ करण्यात आली. सॅम पित्रोदा यांनी भारतीय नागरिकांविरोधात आक्षेपार्ह वर्णद्वेषी टिप्पणी केली होती.
 
त्यांनी भारतातील नागरिकांची तुलना चीन, अरब, गोरे आणि आफ्रिकन लोकांशी केली. विविधता आणि लोकशाहीबद्दल बोलण्याच्या नावाखाली त्यांनी हे केले. ते म्हणाले होते की, पूर्व भारतातील लोक चिनीसारखे दिसतात, पश्चिम भारतातील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तर भारतीय गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. त्याचप्रमाणे वारसा कर लावण्याचेही त्यांनी समर्थन केले होते. ते म्हणाले की, एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचा मोठा हिस्सा सरकारने ताब्यात घेतला पाहिजे.
 
सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे राजकीय गुरू असल्याचे सांगितले जाते. राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावेळी ते कायम त्यांच्यासोबत असतात. पण, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस चांगलीच अडचणीत आली होती. त्यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळं करत काँग्रेसने त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. मात्र, आता निवडणुक होऊन महिनाही झाला नाही, तेच सॅम पित्रोदांची पुन्हा एकदा अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.