घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित!

    26-Jun-2024
Total Views |

Ghatkopar hoarding 
 
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त आयुक्त कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या ते अतिरिक्त पोलीस महासंचालक (मानवाधिकार संरक्षण) या पदावर कार्यरत होते. राज्याच्या गृह विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
 
निकषांकडे दुर्लक्ष करून १२० x १४० चौरस फूट आकाराचे मोठे होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी देऊन आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप खालिद यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेता स्वतःहून होर्डिंग मंजूर केले. यामध्ये प्रशासकीय त्रुटी व अनियमितता आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
राज्याच्या गृह विभागाने मंगळवार, २५ जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी मो. कैसर खालिद यांना पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत आहे. ज्या कालावधीसाठी हा आदेश अंमलात राहील त्या कालावधीत, निर्वाह भत्ता, महागाई भत्ता आणि देय असलेले इतर भत्ते अदा केले जातील. यासाठी त्यांना इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी, व्यवसाय किंवा व्यवसायात गुंतलो नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
 
तपासात धक्कादायक बाबी समोर :
 
- रेल्वे पोलिसांना ४०० टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखवत 'इगो प्रायव्हेट लिमिटेड'च्या माजी संचालिका जान्हवी मराठे यांनी घाटकोपर होर्डिंगचे कंत्राट मिळविल्याचे तपासात समोर आले.
 
- अनेक महत्वाच्या पत्रव्यवहारात मराठे यांच्या स्वाक्षऱ्या असलेली कागदपत्रे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती लागली.
 
- होर्डिंगच्या कंत्राटासाठी दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्तांशी केलेल्या पत्रव्यवहारावर मराठे यांची स्वाक्षरी आहे.
 
- याच कार्यकाळात 'इगो' कंपनीकडून त्यांच्या खात्यात ३३ लाख ५० हजार रुपये जमा केल्याचे आणि मर्सिडिज कार दिल्याचेही समोर आले आहे.
 
- होर्डिंग दुर्घटनेनंतर पसार झालेल्या जान्हवी मराठे (४१) आणि कंत्राटदार सागर कुंभार (३६) या दोघांना गोव्यातील एका हॉटेलमधून दोन आठवड्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आले आहे.
 
- या प्रकरणात यापूर्वी 'इगो'चा संचालक भावेश भिंडे आणि स्ट्रक्चरल ऑडिटर मनोज संघू यांना अटक करण्यात आली आहे.