केजरीवालांच्या अडचणी वाढल्या; दिल्ली दारू घोटाळ्यात चौकशीसाठी सीबीआयने घेतले ताब्यात
26-Jun-2024
Total Views | 43
नवी दिल्ली : दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. सीबीआयच्या पथकाने त्यांना तिहार तुरुंगातून न्यायालयात नेले, जिथे न्यायालयाच्या परवानगीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने न्यायालयाला सांगितले की त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना औपचारिकपणे अटक केली आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली आहेत.
मंगळवार, दि. २५ जून रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली होती आता अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे, ज्यावर बुधवार, दि. २६ जून २०२४ सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. सीबीआयने न्यायालयाकडे चौकशीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीची मागणी केली, जी न्यायालयाने मान्य केली. सध्या दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्ट आणि आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सीबीआयने सोमवारी तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली होती आणि आता बुधवार, दि. २६ जून २०२४ सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना औपचारिकपणे अटक केली.