वर्सोवा खाडीनजीक पाईपलाईन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी धनादेश सुपूर्द

    23-Jun-2024
Total Views |
family memebers relief check cm residence thane


मुंबई :   
 वर्सोवा खाडीशेजारी एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन कामावेळी घडलेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यादव यांच्या कुटुंबियांना ठाणे येथील निवासस्थानी हा धनादेश देण्यात आला आहे.
दरम्यान, एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने ३५ लाख रुपये तर १५ लाख विम्याचे असे एकूण ५० लाखांचा धनादेश राकेश यादव यांच्या कुटूंबियांना देण्यात आला आहे. तसेच राकेश यांचा भाऊ दुर्गेश यांना एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीए, एल अँड टी, सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांचे एकत्रितपणे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याआधीच यादव कुटूंबियांना ही मदत सुपूर्द करण्यात आली आहे.

यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच, एमएमआरडीएचे सह- आयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर आदी उपस्थित होते.