चला, माणुसकी व्हायरल करुया!

    22-Jun-2024
Total Views |
vasai murder arati yadav


काही दिवसांपूर्वीच वसईमध्ये भर रस्त्यात आरती यादव या तरुणीचा लग्नाला नकार दिल्यामुळे तिच्या माथेफिरु प्रियकराने भर रस्त्यात निर्घृण पद्धतीने खून केला. नेहमीप्रमाणे यंदाही लोकांनी बघ्याचीच भूमिका घेतली. काहींनी आरतीला मदतीचा हात देण्यापेक्षा हातातील मोबाईलमधून व्हिडिओ शूट करुन ते व्हायरल करण्याचा खटाटोप केला. यानिमित्ताने घडलेल्या घटनेतून घ्यावयाचा धडा आणि समाजाने असले व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा माणुसकीच व्हायरल करण्याची गरज याविषयी...

एक-दोन वर्षांपूर्वीची व्हायरल बातमी : ‘लिव्ह-इन-पार्टनरने वसईतील तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले’. तिच्या अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी (इन्स्टाग्रामवर 28-30 हजार फॉलोअर्स असलेला) आरोपी 18 रात्री दिल्लीत फिरत होता. ‘ही घटना ताजी असताना‘ असेही म्हणता येणार नाही. कारण, इतक्या घटना घडल्या की आपण विसरूनही गेलो. पुण्यातील पोर्शे कारसारख्या एकापेक्षा एक घटना आपल्याकडे घडतच असतात. आपण वाचतो, पाहतो, हळहळ व्यक्त करतो. बस एवढंच.. अगदीच चर्चा पुढे गेली तर प्रश्न पडतात ‘जर ती कार पोर्शे नसती आणि एक सामान्य कार असती तर? ड्रायव्हर अतिश्रीमंत बिल्डरचा मुलगा नसून, एक सामान्य माणूस असता तर? तर कदाचित शिक्षा लवकर झाली असती का? वगैरे वगैरे.

प्रश्न काय पडणारच! आज हा प्रश्न तर उद्या दुसरा! डिजिटल युगात बातम्याच एवढ्या सुपरफास्ट झाल्यात की आपण आधीच्या प्रश्नाच्या उत्तराची देखील वाट पाहत नाही. काही दिवसांपूर्वीची आरती यादवची बातमी बघितली की पुन्हा अनेक प्रश्न पडतात.

मुंबईलगतच्या वसईमध्ये दिवसाढवळ्या भर रस्त्यात तिची हत्या करण्यात आली. अनेक जणं या हत्येचे प्रत्यक्षदर्शी बनले. परंतु, आरतीला वाचवण्यात किंवा आरोपीला किमान मारण्यापासून थांबवण्यासाठी (एक अपवाद वगळता) कोणीही पुढे सरसावलं नाही. मोबाईलच्या कॅमेर्‍यात मात्र त्याच लोकांनी कैद केलं. व्हिडिओ पूर्ण शूट झाल्यावर लोक मोबाईलचा कॅमेरा बंद करुन (तो व्हायरल करण्यासाठी) निघून गेले. हत्या करणार्‍या, मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणावर कठोर कारवाई होईलही. पण, जे व्हायरल करण्यासाठी या दुर्देवी घटनेचा व्हिडिओ मोबाईलमधून शूट करीत होते, अशा मानसिक संतुलन नसलेल्यांचं काय, हा अशा घटनांमधून वारंवार पडणारा प्रश्न. अर्थातच उत्तर सापडेपर्यंत म्हणा किंवा माझा हा लेख प्रकाशित होईपर्यंत, दुसरी बातमी व्हायरल झालेली असेल, यात काही शंका नाही.

खरंच सेल्फीच्या जमान्यात एका तरुणीसह माणुसकीचीही हत्या झाली, हे या घटनेवरून उघड आहे. आरोपी कोण तर तिचाच प्रियकर. त्या भारदस्त, राकट नसलेल्या तरुणाच्या हातात कोयता किंवा बंदूकदेखील नव्हती. एक साधा पाना हातात असलेल्या व्यक्तीस रोखण्यास बघ्यांची गर्दी अजिबात कामी आली नाही. एरव्ही देशात हिंदू, मुस्लीम, शीख, दलित, मराठा असे वर्गीकरण करून एकमेकांविरोधी वातावरण तयार करताना गर्दीतली ही मंडळी फारच आग्रही दिसतात. तेव्हा मात्र ‘सामाजिक सहिष्णुता’ आणि ‘सौहार्द’ अशा गोष्टींचे दाखले दिले जातात. ही गर्दी सोशल मीडियावर ट्रोलिंग करायला, नारेबाजी करायला, व्हॉट्सअप ग्रुपवर ‘ज्ञानबाजी‘ करायला, नावे ठेवायला, अंधपणे आपला विश्वास असलेले व्हिडिओ व्हायरल करायला सगळ्यात पुढे असते. आपले विचार कमेंटच्या आधाराने किंवा लाईक्सच्या माध्यमातून व्यक्त करुन किंवा टीका करुन काहीतरी क्रांतिकारी कार्य केल्यासारखे मिरवण्यात पांढरपेशा समाजही तितकाच पुढे असतो.

सारासार विचार करता, समाजात पापपुण्याचा हिशेब घालणारे, (पाहिजे तर सज्जन म्हणूया) समाजात अशांची संख्या नक्कीच दुर्जनांपेक्षा जास्त नाही का! पण, या सज्जनांमध्ये ‘जागरुक नागरिक’ किती? भडकावू मेसेज ग्रुपवर पाठवले की आपला आत्मा जीवंत आहे, याची ह्याची जाणीव. ’ठखझ’ मेसेज टाकले की मृत व्यक्ती तथाकथित सोशल मीडियावर ते वाचेल आणि आपल्याला पुण्य मिळेल, असे समाधान, केवळ ही मानसिकता बनली आहे का?

कारण अशा घटना कुठेना कुठे होतच असतात आणि त्या व्हायरल होतात. त्यावर ताबडतोब न्याय होत नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढते. पुन्हा चर्चा होते आणि कालांतराने म्हणजे काही वर्षांनी नव्हे, काही दिवसांतच आपण विसरतो. मग पुन्हा ‘सोशल मीडियावर न सोसणारी’ घटना व्हायरल होते आणि हे दुष्टचक्र सुरूच राहते. एकंदर काय मानवी संवेदना बोथट होत चालल्या आहेत!

यादव प्रकरणात आणखी एक गोष्ट समोर आली ते म्हणजे, पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते तर त्या मुलीचे प्राण वाचले असते, असे तिची बहीण म्हणाली. (बातमीत वाचल्यानुसार) ते जेव्हा दहा दिवसांपूर्वी पोलिसांकडे गेले, तेव्हा त्याला उठाबशा काढायला लावल्या. म्हणजे निबंध लिहायला लावण्याचे उदाहरण डोळ्यांसमोर असताना मोबाईल फोडला म्हणून उठाबशा सांगणार्‍या पोलिसांचा दोष म्हणता नाही येणार तसा! सगळेच कसं विदारक आहे. पण, शेवटी सामोरे तर जावे लागणारच. मानसिकता, संवेदना थोड्या बदलायला नको का? थोडी माणुसकी वायरल करूया का?

जीवनातले यशापयश संपूर्णपणे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते, हे आपण जाणतो. मग काय केल्याने बदल घडू शकेल? कदाचित जात, धर्म, पंथ, यापलीकडे जाऊन दुसर्‍यांच्या प्रति सद्भाव आणि जागृत जाणिवांची सुरुवात स्वतःपासून केली तर परिस्थिती सुधारेल. राजकारण, धर्म, इतिहास इत्यादी गोष्टींवर उदरनिर्वाह चालवायचा नसेल, तर या गोष्टींना अवास्तव महत्त्व न देता, एकमेकांशी आपुलकीने, माणुसकीने वागले, आपल्या ध्येयाकडे सकारात्मकतेने पाहिले, तर कितीतरी फरक पडेल. तितकं आयुष्य सुकर होईल. अहो शेवटी गरजवंताला कुठली जात, कुठला धर्म, कुठले वय आणि हल्ली कुठला पक्ष उरलाय! वय आणि वेळ यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही मग परिस्थितीवर तरी ठेवू.

चांगला समाज आणि चांगली पुढची पिढी निर्माण करायची असेल, तर त्यादृष्टीने आपल्या जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन ठेवायला हवा. भावी पिढीसमोर चांगले उदाहरण आपल्या वागण्यातून ठेवायला हवे. त्यांच्या बालमनात द्वेष न पसरवता त्यांचा सामाजिक, भावनिक, बौद्धिक विकास व्हावा म्हणून लहानपणीपासून त्यांना वाचनाचे, खेळण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचे कुतूहल जागृत ठेवले की वाढ व विकास व्यवस्थित होतो.

बहुतांश वेळा असं आढळून आलं आहे की, अशा घटना अचानक होत नाही, तिची पाळंमुळं आधीच खोलवर हातपाय पसरून मनाची जमीन वेढून बसलेली असतात. रागाच्या भरात किंवा भावनेच्या भरात अचानक अशा घटना क्वचित कुठे होतात. पण, अशा गरजूंना निसरड्या वाटेवर सावरणारी माणसं, कुटुंबात समजून घेणार्‍या व्यक्ती किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्था-संघटना, समुपदेशकांचे समूह यांची साथ-सोबत मिळाली, तर नैराश्येचा घेरा कमी होऊ शकतो. आयुष्याभोवती वाढत चाललेला वैफल्याचा विळखा सैल होऊन मोकळा श्वास घेऊन, आपल्या आयुष्याकडे नव्या आशेने बघू शकू तरच मानवता टिकेल.

तरुण पिढीनेदेखील हे लक्षात घेतले पाहिजे की, माणसाच्या आयुष्यात चढउतार येतच असतात.

परीक्षेत अपयश, प्रेमभंग, अपेक्षाभंग, आई-वडिलांशी न पटणे, आर्थिक स्तराविषयी न्यूनगंड अशा गोष्टींनी घाबरून मनाची दुरवस्था होणार नाही, याकडे तरुणांनी लक्ष दिले पाहिजे. मोहाला बळी पडून सैराट होऊ नये. सोशल मीडिया वापरा, पण त्याला आपले जग मानू नका आणि त्या जगात हरवून जाऊ नका. जसे ‘नाही’ बोलता येणे महत्त्वाचे आहे, तसेच दुसर्‍याने ‘नाही’ म्हटलेले पचवताही आले पाहिजे. त्यासोबतच प्रत्येकाने स्वसुरक्षा कशी करता येईल, यावर लक्ष दिले पाहिजे. मग तो मुलगा असो वा मुलगी. हल्ली शिक्षण सगळेच घेतात, पण सुशिक्षित किती हो बनतात? पुढची पिढी सुशिक्षित बनली तरच फरक पडेल! हे सगळे जरी खरे असले तरी आपण असं सरळ सरळ ‘हे चूक’, ‘हे बरोबर’ असं म्हणू शकत नाही, हे ही तितकच खरं. आपण प्रत्येकाला एका साच्यात बसवूही शकत नाही किंवा वागायलाही शिकवू शकत नाही. माझं प्रांजळ मत आहे - सगळे जण चुकीचे असतात - काही कमी चुकीचे असतात, तर काही जास्त. ‘पूर्ण बरोबर’ असा एकही नसतो. कारण, नेमकं बरोबर काय आहे? ते कोणालाच येथे माहित नाही. आपण आपापला अर्थ काढत राहतो एवढंच!

द्वेषापेक्षा प्रेम अधिक फायदेशीर आहे, हे कोणीही कबूल करेल मग ते पसरवूया. त्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार आणि उच्च नैतिकता विकसित करणे आवश्यक आहे. आपल्याला मानवतेचा धडा शिकण्याची आवश्यकता आहे. समाज मानवता आणि नैतिक मूल्यांपासून दूर जाऊ नये म्हणून आपली वृत्ती आणि वागणूक बदलून स्वतःमध्ये संवेदना निर्माण करणे आवश्यक आहे. आपण एकमेकांशी कसे वागतो, याबद्दल आपण सर्वजण जागरूक राहू शकतो. आपल्याला थोडा प्रयत्न करावा लागेल. कारण, द्वेष आणि मत्सर नैसर्गिकरित्या येतात आणि प्रेम आणि समर्थन यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. म्हणूनच आपण एक छोटेसे काम करुया, आपण द्वेष, मत्सर नव्हे तर माणुसकी व्हायरल करूया!

संध्या सामंत-सावंत
(लेखिका समाजकार्यात कार्यरत असून महिला /बालसुरक्षा विषयक उपक्रम राबवतात. त्यांचे सामाजिक, मानसिक, बालसाहित्य अशा विषयांवर लेख, पुस्तकेदेखील प्रकाशित झाली आहेत.)