भाजप कोअर कमिटीची मध्यरात्रीपर्यंत बैठक! बावनकुळे म्हणाले, "विधानपरिषद..."

    22-Jun-2024
Total Views |
 
Bawankule
 
मुंबई : महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणूकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली असल्याचे सांगितले आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर रात्री ८ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत भाजप कोअर कमिटीची ५ तास बैठक पार पडली. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "या बैठकीत लोकसभा निवडणूकीसंबंधी विश्लेषण केलं. ज्याठिकाणी कमी पडलो तिथे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा केली. विधानपरिषदेसंदर्भातही चर्चा केली. यावेळी सामाजिक, भौगोलिक परिस्थिती आणि आणखी काही निकषांवर चर्चा करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी आम्हाला मिळणाऱ्या जागांच्या नावांबद्दल चर्चा करण्यात आली आहेत. ती नावं केंद्रात पाठवणार असून त्यावर निर्णय होईल," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला जामीन! पण सुटका नाही
 
ते पुढे म्हणाले की, "आज महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोट्या गोष्टी पसरवून मतं घेतलीत. मोदीची संविधान बदलणार आणि आदिवासी समाजाचे हक्क काढून घेणार असं खोटं बोलून त्यांनी मतं घेतली. परंतू, आता लोकांना वाटतं आहे की, आम्ही खोट्या गोष्टींमुळे तिकडे गेलो. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकार वचन दिल्यानुसार काम करतील. त्यामुळे जनता नक्की या खोटारडेपणातून बाहेर निघेल. केंद्र सरकार आता जे काम करणार आहे त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. महाविकास आघाडी सरकार येणं म्हणजे मोदी सरकारचे संपुर्ण काम बंद करणे आहे. केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार एका विचाराचं असेल तर राज्यातील जनतेला फायदा होतो. त्यामुळे जनता नक्की पुन्हा आम्हाला साथ देईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
"उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये मोदीजी महाराष्ट्रासाठी खूप मदत करायला तयार होते. पण उद्धवजी कधीही मंत्रालयात आले नाहीत. आम्हाला मोदीजींचं काही नको. आम्हाला मोदी सरकार चालत नाही या भूमिकेतून त्यांनी काम केलं. त्यामुळे दोन्हीकडे एका विचाराचं सरकार असेल तर जनतेचा फायदा होईल," असेही ते म्हणाले.