ओबीसी शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची आज महत्वपूर्ण बैठक!
21-Jun-2024
Total Views | 36
मुंबई : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य सरकार आणि ओबीसी शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर हे सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी दाखल झालं होतं. त्यानंतर आता ओबीसी शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची आज सायंकाळी ६ वाजता महत्वपूर्ण बैठक होणार आहे. ओबीसी शिष्टमंडळात छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासोबत लक्ष्मण हाके यांचे चार समर्थकही राज्य सरकारची भेट घेणार आहेत.
गेल्या ९ दिवसांपासून लक्ष्मण हाके वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन देण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे. तसेच ५४ लाख नोंदी मागच्या दाराने वाटप सुरू असून ते तात्काळ थांबवावं आणि त्या नोंदी रद्द कराव्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत यावर काय चर्चा होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.