मेट्रो २अ आणि ७च्या फेऱ्यांमध्ये वाढ

पावसाळ्यात होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी निर्णय

    21-Jun-2024
Total Views |

metro 2 A & 7


मुंबई, दि.२१ :
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मेट्रो २अ ( दहिसर – डी. एन. नगर ) आणि मेट्रो ७( दहिसर – अंधेरी ) मार्गिकेवर अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतला आहे. पावसाळ्यात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता दिवसाला ७ मिनिटांच्या वारंवारतेसह या मार्गिकांवर २४ अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली आहे.
'मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्या लागल्या असून या मार्गिकांवरील प्रवासी संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ही संख्या लक्षात घेता एमएमएमओसीएलने फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. अशातच लोकल रेल्वेच्या अनियमित वेळामुळे अनेक प्रवासी हे मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य देताना दिसतात. हे पाहता पावसाळयात गर्दीच्या वेळेत २४ अतिरिक्त सेवा चालविण्याचा निर्णय एमएमएमओसीएलने घेतला आहे.
त्यामुळे आता दिवसाला ७ मिनिटांच्या वारंवारतेसह या मार्गिकांवर २४ अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे दिवस एकूण फेऱ्यांची संख्या २८२ वर पोहोचली आहे. इतकेच नाहीतर ३ स्टँडबाय मेट्रो ट्रेनसह, आम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार आहोत, अशी माहिती एमएमसीएलने दिली आहे. मुंबई मेट्रोला त्यांच्या वाहतुकीचे मार्ग म्हणून स्वीकारून, मुंबईकरांना वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, विशेषत: पावसाळ्यात पीक अवर्समध्ये वाढीव सेवांचा फायदा होत आहे, अशी माहितीही एमएमएमओसीएलने दिली.