मक्का : हज यात्रेत उष्णतेच्या लाटेमध्ये आतापर्यंत 645 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तसेच, सौदी अरेबियातील एका अधिकार्याने सांगितले की, “यावर्षी हज यात्रेदरम्यान उष्णतेच्या लाटेमध्ये 68 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘आम्ही सुमारे 68 मृतांची पुष्टी केली आहे. यातील अनेक वृद्ध यात्रेकरू होते. त्यामुळे यातील काही नैसर्गिक कारणांमुळे, तर काही हवामानाच्या परिस्थितीमुळे मरण पावले आहेत, असे आम्ही गृहीत धरतो,” असे अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले.
इस्लाममध्ये हजच्या यात्रेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सौदीतील दोन अधिकार्यांनी मंगळवार, दि. 18 जून रोजी एएफपीला सांगितले की, “हज दरम्यान 550 मृत्यूंची नोंद झाली आहे. मात्र एएफपीच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 645 आहे. त्या आकडेवारीत 323 इजिप्शियन आणि 60 जॉर्डनचा समावेश होता,” असे अरबी अधिकार्यांनी सांगितले.इंडोनेशिया, इराण, सेनेगल, ट्युनिशिया आणि इराकच्या स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेशानेदेखील मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये अधिकार्यांनी कारण स्पष्ट केलेले नाही.
गेल्यावर्षी 200 पेक्षा अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. त्यांपैकी बहुतेक इंडोनेशियाचे होते. भारतीयांच्या मृत्यूची पुष्टी करणारे अधिकारी म्हणाले की, “काही भारतीय यात्रेकरू बेपत्ता आहेत.” परंतु, त्यांनी अचूक संख्या सांगण्यास नकार दिला. “हे काहीसे गेल्यावर्षीसारखेच आहे. पण, येत्या काही दिवसांत आम्हाला अधिक माहिती मिळेल,” असेही त्यांनी सांगितले.गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या सौदी अभ्यासानुसार, ज्या भागात विधी केले जातात, त्या भागातील तापमान प्रत्येक दशकात 0.4 अंश सेल्सिअसने (0.72 अंश फॅरेनहाइट) वाढत आहे.