युपीआय प्रणालीने मे महिन्यात विक्रमी 14.04 अब्ज व्यवहार नोंदवले. त्यांचे मूल्य तब्बल 20.45 लाख कोटी रुपये इतके आहे. प्रत्येक महिन्याला ही प्रणाली स्वतःचेच विक्रम मोडीत काढून, नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. काँग्रेसी तथाकथित अर्थतज्ज्ञांनी याची खिल्ली उडवली होती. भारतात ही प्रणाली यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. आज त्यांना भारतीयांनीच खोटे ठरवले आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे संचालित युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीचा वापर करत, एप्रिलमधील 13.3 अब्ज व्यवहारांच्या तुलनेत, मे महिन्यात सर्वकालीन विक्रमी 14.04 अब्ज व्यवहार झाल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. हा एक नवीन विक्रमच. मूल्यानुसार, यूपीआयने मे महिन्यात तब्बल 20.45 लाख कोटी रुपयांचे व्यवहार नोंदवले. एप्रिलमधील व्यवहारांचे मूल्य 19.64 लाख कोटी रुपये इतके होते. मे महिन्यातील सरासरी दैनिक व्यवहारांची संख्या 453 दशलक्ष इतकी आहे, ज्यात वार्षिक 49 टक्के इतकी वाढ झाली. यूपीआय ही म्हणूनच, देशातील सर्वात वेगाने वाढणारी डिजिटल पेमेंट प्रणाली ठरली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही याचा प्रभावीपणे वापर होत असून, यूपीआयचे हेच वैशिष्ट्य ठरले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम यूपीआय करत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारच्या डीबीटी योजनांच्या लाभार्थ्यांना यूपीआय प्रणालीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्हा सहकारी बँका तसेच ग्रामीण सहकारी बँकांही डिजिटल प्रणालीचा वापर करत आहेत. भारतात आपले बस्तान बसवल्यानंतर, ही प्रणाली आता अन्य 20 देशांतही राबवली जाणार आहे. आज ती सिंगापूर, फ्रान्स, यूएई, इंग्लंड, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, मॉरिशस यासारख्या देशांमध्ये उपलब्ध आहे.
भारतातील डिजिटल क्रांतीमुळेच यूपीआय प्रत्येक महिन्याला विक्रमी व्यवहारांची नोंद करत आहे, हे नाकारून चालणार नाही. ही क्रांती एका दिवसात झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारतामध्ये जगातील अन्य कोणत्याही देशांपेक्षा स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध आहे. त्यामुळे हाय स्पीड डाटा वापर करायला मिळतो. एका अहवालानुसार, देशात 700 दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते असून, ते दररोज सरासरी 17 जीबी मोबाइल डेटा वापरतात, जो चीनमधील 13 आणि उत्तर अमेरिकेतील 15 जीबीपेक्षा जास्त आहे. 140 कोटी ग्राहकांची ही भली मोठी बाजारपेठ जगभरातील उद्योगांना म्हणूनच भुरळ पाडत आहे. भारतीयांचा यूपीआयवरचा विश्वास का वाढला, हेही समजून घ्यायला हवे. मोबाईलचा वापर करून काही क्षणात पूर्ण होणारा व्यवहार, हा पूर्णपणे सुरक्षित असतो. काही तांत्रिक कारणाने तो रखडला, तरी रक्कम सुरक्षित राहते. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक ठिकाणी मोबाईल वापरून देयके देण्याची, तसेच स्वीकारण्याची सोय हे यूपीआयचे वैशिष्ट्य आहे.
चलनी नोटांवरचे अवलंबत्व पूर्णपणे संपवणारी ही यंत्रणा लोकप्रिय ठरली आहे. म्हणूनच, दर महिन्याला यूपीआय व्यवहाराचे उच्चांक गाठले जात असून, ऑनलाइन शॉपिंग हे आता दैनंदिन व्यवहारातील सर्वच गोष्टींसाठी वापरले जात आहे. त्यामुळेच महानगर असो वा तालुका स्तरावरचे गाव, सर्वच ठिकाणी ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य दिले जात आहे. व्होकल फॉर लोकल या अंतर्गत स्थानिक उत्पादने जाहिरात करून ऑनलाईन विकली जात आहेत. सर्वच उद्योगांनी ऑनलाईन जाणे पसंत केले असल्यामुळे त्यांचे ऑनलाईन व्यवहार होत आहेत. नोटाबंदीनंतरच्या काळात यूपीआयने स्वतःची सुरक्षितता सिद्ध केली. ग्राहकांनी तिच्यावर विश्वास ठेवला. म्हणूनच ग्राहक डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देऊ लागले. तुलनात्मक कमी दरात असलेले इंटरनेटसाठीचे दर ग्राहकांना ऑनलाइन होण्यास प्रोत्साहित करणारे ठरले आहेत.
युपीआय ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे विकसित केलेली, मोबाइल फोनद्वारे आंतर-बँक व्यवहार सुलभ करण्यासाठीची रिअल-टाइम पेमेंट प्रणाली आहे. रुपे हे भारताचे स्वतःचे कार्ड पेमेंट नेटवर्क आहे. या दोन्ही देशांशी भारताचे संबंध वृद्धिंगत करणारी महत्त्वाची घडामोड म्हणून याची नोंद घ्यावीच लागेल. त्याचवेळी यूपीआय तसेच रुपे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारी का ठरले, हेही पाहायला हवे. यूपीआयने आर्थिक समावेशनाला लक्षणीयरीत्या चालना दिली. लाखो भारतीयांना वित्तीय प्रणालीत आणणारी ही प्रणाली, असे ढोबळमानाने तिचे वर्णन करता येईल. एका अहवालानुसार 675 दशलक्ष भारतीय तिचा वापर करतात. यूपीआय हे आर्थिक समावेशन असून, व्यवहारात पारदर्शकता आणण्याबरोबरच ही प्रणाली पूर्णपणे सुरक्षित पद्धतीचा अवलंब करून व्यवहार पूर्ण करते.
ग्रामीण भागापासून ते महानगरांपर्यंत म्हणूनच या प्रणालीचा विस्तार झाला आहे. डिजिटल पेमेंटसाठीची ही मोठी पायाभूत सुविधा उभारली गेली, असे म्हटल्यास त्यात काहीही चुकीचे ठरणार नाही. म्हणूनच जगभरात कोठेही उपलब्ध नसलेली ही सुविधा भारतात मिळते. म्हणूनच अनेक देशांना त्यांच्या देशात या धर्तीची सेवा हवी आहे. त्यांनी भारताकडे यासाठीचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मदत मागितली आहे. त्याचा फायदा भारतालाही होणार आहे. जे पर्यटक तिथे जातात, त्यांनाही या प्रणालीचा फायदा होईल. त्याशिवाय त्यासाठी विदेशी चलनाची गरज अत्यंत मर्यादित राहील. जे विद्यार्थी विदेशात शिक्षणासाठी जातात, त्यांनाही क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. भारतात यूपीआय व्यवहारांची संख्या प्रत्येक महिन्याला नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे, त्यातून होणारे व्यवहार विक्रमी संख्येचे आणि मूल्याचे आहेत. म्हणूनच संपूर्ण जगात तशा पद्धतीने कॅशलेस इकॉनॉमीसाठी प्रयत्न झाले, तर त्याचा मोठा लाभ सर्वांनाच मिळणार आहे. भारताबाहेर जाणार्यांना सोबत चलन बाळगण्याची गरज राहणार नाही, तर बाहेर देशांतील भारतीयांना मायदेशी ताबडतोब पैसे पाठवायचे असतील, तर त्यांना हा सुरक्षित कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध होईल.
डिजिटल पेमेंटमध्ये भारत हा जागतिक नेता असल्याचे गौरवोद्गार ‘मेटा’चा सर्वेसर्वा झुकेरबर्गनेही काढले आहेत. व्हॉट्सअॅप या भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठीचा पर्याय झुकेरबर्गने दिला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्याचे वापरकर्ते उत्पादने तसेच सेवांसाठी ‘यूपीआय’ प्रणालीचा वापर करत पैसे देऊ शकतात. जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेतून महसूल वाढवण्यासाठी झुकेरबर्गने ही सुविधा दिली असल्याचे मानता येईल. तंत्रज्ञानात भारत आघाडीवर असल्याचेही झुकेरबर्ग म्हणतो. भारताने डिजिटल पेमेंट प्रणाली कशी राबवावी, यासाठी संपूर्ण जगाला मार्ग दाखवला आहे, असेही त्याचे म्हणणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जेव्हा यूपीआयची घोषणा केली, तेव्हा काँग्रेसी नेते पी. चिदंबरम यांनी त्यांची चेष्टा केली होती. भारतात इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे का, स्मार्टफोन सगळ्यांकडे आहेत का, असे कुत्सित उद्गार त्यांनी काढले होते. काँग्रेसी नेते पी. चिदंबरम यांनी जेव्हा ही प्रणाली सादर केली गेली, तेव्हा त्यावर टीका केली होती. भारतात ती यशस्वी होईल, असे आपणास वाटत नाही. भारतीयांसाठी ती वापरणे, हे खूप अवघड आहे, अशा शब्दांत त्यांनी योजनेच्या यशस्वितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे तंत्रज्ञान भारतीयांसाठी सर्वस्वी अपरिचित असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तथापि, या अर्थतज्ज्ञाचे म्हणणे भारतीयांनी खोडून काढले. ‘यूपीआय’ला भारतात प्रचंड यश मिळाले. आज ही देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट प्रणाली बनली आहे. मे महिन्यातील ताज्या आकडेवारीने पुन्हा एकदा यूपीआयचे यश अधोरेखित करताना, चिदंबरम यांचे म्हणणे खोटे ठरवले आहे.