नालंदा पुनरुज्जीवनाद्वारे भारताच्या सुवर्णयुगाचा प्रारंभ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    19-Jun-2024
Total Views |
pm narendra modi nalanda university


नवी दिल्ली :      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्‌घाटन केले. भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद (ईएएस) देशांमधील सहकार्य म्हणून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी देशांच्या मिशन प्रमुखांसह अनेक मान्यवर या उद्‌घाटन समारंभाला उपस्थित होते.




सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याच्या 10 दिवसांत नालंदाला भेट द्यायला मिळणे हे आपले भाग्य आहे ‘नालंदा’ हे फक्त एक नाव नाही, ती एक ओळख आहे, एक सन्मान आहे. नालंदा हे मूळ आहे, मंत्र आहे. पुस्तके आगीत जळली तरी ज्ञानाचा नाश होऊ शकत नाही या वस्तुस्थितीची नालंदा ही घोषणा आहे,” असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
 

नवीन नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल. नालंदाचे तिच्या प्राचीन भग्नावशेषांच्या जवळ पुनरुज्जीवन केल्यामुळे जगाला भारताच्या क्षमतेची ओळख होईल कारण ती जगाला हे सांगेल की भक्कम मानवी मूल्ये असलेल्या देशांमध्ये आपल्या इतिहासाचे पुनरुज्जीवन करून एका चांगल्या जगाची निर्मिती करण्याची क्षमता असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
नालंदा जगाचा, आशियाचा आणि अनेक देशांचा वारसा आपल्यासोबत वाहात आहे आणि त्याचे पुनरुज्जीवन हे केवळ भारतीय पैलूंच्या पुनरुज्जीवनापुरते मर्यादित नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आजच्या उद्‌घाटन सोहळ्याला अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतून हे सिद्ध होत आहे असे त्यांनी नालंदा प्रकल्पामध्ये मित्र देशांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत सांगितले. त्यांनी बिहारच्या जनतेची देखील नालंदामध्ये प्रतिबिंबित होत असलेले आपले वैभव परत आणण्याच्या निर्धाराबद्दल प्रशंसा केली.


असे आहे नालंदा विद्यापीठ
 
नालंदा विद्यापीठ प्रांगणात दोन शैक्षणिक ब्लॉक असून यातील 40 वर्गखोल्यांची एकूण आसन क्षमता सुमारे 1900 इतकी आहे. यामध्ये प्रत्येकी 300 आसन क्षमता असलेले दोन सभागृहे आहेत.

येथे सुमारे 550 विद्यार्थी क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृह आहे. या प्रांगणात आंतरराष्ट्रीय केंद्र, सुमारे 2000 लोकांना सामावून घेणारे ॲम्फी थिएटर, फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासह इतर विविध सुविधा उपलब्ध आहेत.
 
हे प्रांगण ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ करणारे हरित प्रांगण आहे. हे प्रांगण सौर ऊर्जा संयंत्र, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारे संयंत्र,100 एकर जलसाठा आणि इतर अनेक पर्यावरणपूरक सुविधांसह स्वयं-पूर्ण आहे.
 
या विद्यापीठाचे इतिहासाशी नाते आहे. सुमारे 1600 वर्षांपूर्वी स्थापन झालेले मूळ नालंदा विद्यापीठ जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानले जाते. 2016 मध्ये, नालंदाच्या अवशेषांना संयुक्त राष्ट्र वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.