दलाई लामांची भेट अन् चीनची आगपाखड!

अमेरिकी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट

    19-Jun-2024
Total Views |
dalai lama usa

नवी दिल्ली :      अमेरिकी शिष्टमंडळाची ही भेट चीनला चांगलीच जिव्हारी लागली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना अमेरिकेला दलाई समूहाचे चीनविरोधी फुटीरतावादी स्वरूप पूर्णपणे ओळखण्याचे आणि जगाला चुकीचे संकेत पाठवणे थांबवण्याचे आवाहन केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, १४ वे दलाई लामा हे धार्मिक व्यक्ती नसून धर्माच्या नावाखाली चीनविरोधी फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले राजकीय निर्वासित आहेत.

दरम्यान, अमेरिकी काँग्रेसचे सदस्य मायकल मॅकॉल यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी काँग्रेसच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांची त्यांच्या धरमशाला येथील निवासस्थानी भेट घेतली. अमेरिका शिष्टमंडळात शिष्टमंडळात अमेरिकेच्या माजी सभागृह सभापती नॅन्सी पेलोसी यांचाही समावेश होता. दलाई लामा यांची भेट घेण्यापूर्वी अमेरिकेचे प्रतिनिधी मुख्य तिबेटी मंदिरातील सार्वजनिक स्वागत समारंभात सहभागी झाले होते.
हिमाचल प्रदेशातील कांगडा विमानतळावर केंद्रीय तिबेट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. धर्मशाला येथील त्सुगलागखांग प्रांगणात झालेल्या सत्कार समारंभात मुलांनी तिबेटी संस्कृतीचे प्रात्यक्षिक दाखवले. धरमशाला येथे झालेल्या बैठकीदरम्यान, मॅकॉल यांनी दलाई लामा यांना तिबेटसाठी अमेरिकन समर्थन वाढवण्यासाठी द रिझोल्व्ह तिबेट कायद्याची फ्रेम केलेली प्रत सादर केली आहे.