हज यात्रेकरूंना उष्माघाताचा फटका; मक्काच्या रस्त्यावर पडले मृतदेह; सौदीच्या तयारीचे निघाले वाभाडे

    18-Jun-2024
Total Views |
 Saudi Arab Hajj
 
रियाद : हज हा मुस्लिम धर्मीयांच्या पाच मोठ्या धार्मिक कार्यांपैकी एक आहे. आयुष्यात एकदा तरी सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना दरम्यान धार्मिक तीर्थयात्रा करणे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. मात्र यंदा सौदी अरेबियात हज यात्रा पूर्ण करण्याच्या नादात लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कडक उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे २७०० हून अधिक लोकांची अवस्था गंभीर आहे.
 
यावर्षी १८ लाख यात्रेकरू हज यात्रेला पोहोचले आहेत. यापैकी १६ लाख लोक परदेशी आहेत. प्रचंड गर्दी आणि उष्णतेच्या लाटेमुळे जॉर्डनमधील १७ आणि इराणमधील ५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो सौदी अरेबियाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ पत्रकार मोहम्मद ताहा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने रस्त्यावर पडलेले मृतदेह दाखवले असून तासन्तास एकही रुग्णवाहिका आली नाही, असा दावा केला आहे.
  
या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला दुभाजक आणि फूटपाथवर अनेक मृतदेह ठेवलेले दिसतात. इतकंच नाही तर व्हिडिओ बनवताना ती व्यक्ती जवळपास अनेक मृतदेह दाखवून सांगतो की बस, ट्रेन, टॅक्सी यासारख्या सुविधा नाहीत आणि लोक मरत आहेत, पण सरकारला त्याची पर्वा नाही.
  
मोहम्मद ताहाने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले की, “या व्हिडिओमध्ये अनेक हज यात्रेकरूंचे मृतदेह दिसत आहेत. याला सौदीचे शासक जबाबदार आहेत का? ते या इस्लामिक पर्यटनाला प्रोत्साहन देतात आणि त्यातून कोट्यवधींची कमाई करतात. पण आतापर्यंत मी त्यावर जास्त मीडिया कव्हरेज पाहिलेले नाही!”
 
इजिप्शियन यात्रेकरू अजा हमीद ब्राहिम, ६१, यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की तिला रस्त्याच्या कडेला मृतदेह पडलेले दिसले. जणू कयामताचा दिवस आला होता. मोठ्या संख्येने होणारे मृत्यू आणि त्यानंतर मृतदेहांची दुरवस्था यावरून लोक सोशल मीडियावर सौदी अरेबियावर टीका करत आहेत.
 
सौदी हवामान सेवेनुसार, मक्काच्या ग्रँड मशिदीमध्ये सोमवार, दि. १७ जून २०२४ तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. या ठिकाणी यात्रेकरू काबाची प्रदक्षिणा करतात. ग्रँड मशिदीजवळ असलेल्या मीनामध्ये तापमान ४६ अंश सेल्सिअस होते. या ठिकाणी हज यात्रेकरूंनी काँक्रीटच्या तीन भिंतींवर सैतानाला दगड मारण्याचा विधी केला जातो. येथील उष्मा आणि गर्दीमुळे परिस्थिती गंभीर बनली होती.