अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारत दौऱ्यावर; २ देशांमध्ये होणार 'हा' महत्त्वपूर्ण करार
17-Jun-2024
Total Views | 23
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन भारत दौऱ्यावर आले आहेत. भारतात पोहोचल्यानंतर त्यांनी भारताचे राष्टीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. सुलिव्हन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (iCET) च्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. ते अजित डोवाल यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील आणि भारत-अमेरिका संबंधांचा आढावा घेतील.
एनएसए सुलिव्हन यांनी सोमवार, दि. १७ जून २०२४ परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांचीही भेट घेतली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. याआधी ते फेब्रुवारीमध्ये भारतात येणार होते, मात्र त्यावेळी त्यांना हा दौरा पुढे ढकलावा लागला होता. आता ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये जयशंकर म्हणाले, "आज सकाळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांचे नवी दिल्लीत स्वागत करताना आनंद झाला. द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. आम्हाला विश्वास आहे की भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आमच्या नवीन कार्यकाळात मजबूत होत राहील."