समुद्री कासवांनी अडवली देशाची कोटींची निर्यात; 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज'ठरले कारक

    15-Jun-2024
Total Views | 292

turtle excluder device



मुंबई (अक्षय मांडवकर)
- कोळंबी पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्राॅल जाळ्यांना 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' (turtle excluder device) उपकरण न लावल्यामुळे अमेरिकेने गेल्या पाच वर्षांपासून भारतामधून होणाऱ्या सागरी कोळंबीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारताला वार्षिक ४ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे करावे लागत असल्याची माहिती 'समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा'ने (एम्पीडा) दिली आहे (turtle excluder device). पावसाळ्यानंतर महाराष्ट्रात 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' वापरण्यासंदर्भातील चाचण्या सुरू होणार असून राज्यातील १४ बंदरांवरील मच्छीमारांना यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (turtle excluder device)


 

'एम्पीडा'ने १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी परिपत्रक काढून अमेरिकेने भारतातून निर्यात होणाऱ्या सागरी कोळंबीवर बंदी आणल्याची माहिती दिली होती. भारतात सागरी कोळंबीची मासेमारी ही प्रामुख्याने ट्राॅल जाळ्यांच्या आधारे होते. अमेेरिकेच्या कोळंबी निर्यातीच्या नियमांप्रमाणे ट्राॅल जाळ्यांमध्ये 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' लावणे बंधनकारक आहे. कारण, ट्राॅल जाळे हे समुद्र तळाला खरडवून मासे पकडते. समुद्र तळ हे सागरी कासवांचे अधिवास क्षेत्र असल्याने बहुतांश वेळा त्यामध्ये ही कासवे अडकली जातात. प्रसंगी त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे या कासवांना जाळ्यांमधून निसटण्यासाठी 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' हे यंत्र मदत करते. यंत्रासंबंधीच्या नियमाची पडताळणी करण्यासाठी २०१९ साली अमेरिकेचे एक पथक भारतात आले होते. त्यांनी ओरिसा, तामिळनाडूबरोबरच महाराष्ट्रातील अर्नाळा बंदरावरही पाहणी केली होती. या पाहणीत त्यांना ' 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' ट्राॅल जाळ्यांमध्ये लावलेले आढळले नाहीत. त्यामुळे सरतेशेवटी त्यांनी सागरी कोळंबीच्या निर्यातीवर बंदी आणली.

 

महाराष्ट्रामधून या बंदीवरील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास आता सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील भागधारकांची पहिलीच बैठक शुक्रवार दि. १४ जून रोजी मुंबईत पार पडली. याठिकाणी 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी'ने (सीआयएफटी) तयार केलेल्या 'टर्टल एक्स्लुडर डिव्हाईज'ची माहिती देण्यात आली. या उपकरणाच्या चाचण्या अमेरिकन तज्ज्ञांच्या उपस्थितीत कोची येथील सुमद्रात फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या आहेत. आता महाराष्ट्रात या चाचण्या आणि ट्राॅल जाळीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना या उपकरणासंबधीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात होणार आहे. भाऊचा धक्का, अलिबाग, वर्सोवा, ससून बंदर, करंजा, साखर-अक्षी, रेवस, जिवना, हर्णे, दाभोळ, मिरकरवाडा, साखरीनाटे, देवगड आणि मालवण येथे या चाचण्या आणि प्रशिक्षण पार पडणार आहे. हे उपकरण तयार करणाऱ्या कंपन्यांची निवड 'सीआयएफटी' आणि 'एम्पीडा' कडून लवकरच करण्यात येणार आहे. या उपकरणाची किंमत साधारण जाळीसकट २० हजार रुपये एवढी आहे. त्यामुळे महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून या उपकरणासाठी मच्छिमारांना अनुदान देण्यासंदर्भातही विचार सुरू आहे.

 

कोटींचे नुकसान

ट्राॅल जाळ्यांमध्ये 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज'च्या वापराची अंमलबजावणी न झाल्यामुळे सागरी कोळंबीच्या निर्यातीमध्ये भारताला वार्षिक ४ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे करावे लागत आहे. सागरी कोळंबीचा अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीचा दर प्रति किलोमागे १० डाॅलर म्हणजेच ८०० रुपये एवढा होता. अमेरिकेने निर्यातीवर बंदी आणल्यामुळे इतर देशांनी देखील निर्यातीचा दर कमी केला असून सध्या हा दर प्रति किलोमागे ४०० रुपये एवढा झाला आहे. - डाॅ. एम. कार्तिकेयन, संचालक, एम्पीडा



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121