मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ च्या पहिल्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. ठिकठिकाणी शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढून, वर्गखोल्यांच्या बाहेर सजावट करण्यात आली होती. तसेच ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थी प्रवेश सोहळा पार पडला. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शालेय वस्तुंचे वाटप ही यावेळी करण्यात आले.
वरळी सी फेस महानगरपालिका शाळेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच 'विद्यार्थी प्रवेश पाडवा' आणि 'पहिले पाऊल' या उपक्रमांचा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याकार्यक्रमास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.