मुंबई : महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहे, अशी घोषणा उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. शनिवारी आयोजित महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, " महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक झालेली आहे. येणारी विधानसभा निवडणूकसुद्धा महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि इतर पक्ष व सामाजिक संघटनांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत," असे त्यांनी सांगितले.
"संपुर्ण देशात भाजपच्या विरोधात कोणी लढू शकत नाही, असं वातावरण होतं. पण त्यांचा अंजिक्यपणा किती फोल आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे आम्ही आभार मानतो. ही लढाई फार विचित्र होती. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. देशातील जनतेने महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीला कौल दिला आहे. साहाजिकच विजय अंतिम नाही. ही लढाई आता सुरु झाली आहे," असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "या निवडणूकीमध्ये मोठा भाऊ, छोटा भाऊ वगैरे काही नाही. प्रत्येक मतदारसंघात सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणूकीचा संदर्भ घेऊन जागावाटपाचा निर्णय घेऊ," असे ते म्हणाले.