मुंबई : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसेल.महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी पाहायला मिळते. शेतात राबून पैसे कमावून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या वैजुची ही गोष्ट आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी असून आपले जीवनमान उंचावणे व गावाच्या सुधारणेसाठी काम करणे हेच तिचे ध्येय आहे.
दरम्यान, वैजुची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने साकाराली असून माझं प्रेरणास्थान अभिनेत्री स्मिता पाटील होत्या असं तिने म्हटलं आहे. ऋतुजा म्हणाली की, " माटी से बंधी डोर या मालिकेत, मी वैजूची व्यक्तिरेखा साकारत आहे, जी खंबीर आहे, स्वतंत्र आहे आणि निडर आहे. वैजू ही व्यक्तिरेखा साकारताना माझ्यासमोर दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आदर्श आहे. त्यांचा वेगळा लूक आणि ज्या साधेपणाने, अभिजाततेने त्या भूमिका साकारायच्या, त्यातून बरेच काही शिकत मी वैजूचे पात्र साकारत आहे. स्मिता पाटील या चित्तवेधक, निर्भय, सहजसुंदर आणि समतोल व्यक्तिमत्त्वाच्या जणू प्रतीक आहेत. त्या माझ्याकरता खरोखरीच प्रेरणास्थानी आहेत आणि माझ्या वैजू या व्यक्तिरेखेद्वारे, प्रेक्षकांना या वैजूत स्मिता पाटीलची झलक दिसावी आणि वैजू ही इतरांकरता प्रेरणा ठरावी असे मला वाटते.”