मुंबई : सुशिक्षित, प्रज्ञावंत, लेखक, संपादक आणि मुंबईतल्या मातीतीला खेळ खेळणारा एक खेळाडू, असा सर्वगुणसंपन्न असा चेहरा आपण मुंबई पदवीधर निवडणुकीत दिला आहे, असे विधान वांद्रे येथील संकल्प मेळाव्यात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी किरण यांचे नाव का सुचवले, याचे गमक काही दिवसानंतर कळले. कारण ते वरळी विधानसभा मतदारसंघातून येतात, असा उपरोधिक टोलादेखील शेलार यांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, सध्या युवासेना आणि अनिल परब यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यांनी केलेली नोंदणी परब यांना द्यायला ते तयार नाहीत. त्यामुळे ही मते किरण शेलार यांना पडणार आहेत, असेही ते म्हणाले. पदवीधरांचे आजवर न सुटलेले असंख्य मुद्दे सोडवण्यासाठी किरण शेलार कटिबद्ध आहेत असे सांगतानाच एक 'तरुण' कार्यकर्ता विधानपरिषदेत आपला आवाज बुलंद करणार आहे, असा विश्वासदेखील आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, केळीचे झाड लावायचे आणि त्याला रताळी किती आली, असे विचारायचे, ही उद्धव ठाकरेंच्या भाषणाची पद्धत आहे. असे सांगतानाच पदवीधरच्या मेळाव्यात ते काश्मीरवर भाषण करतात, असा घणाघात आशिष शेलार यांनी उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरेंवर केला. तसेच, त्यांचा कंठशोष होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला.