मुंबई, दि.१३: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव ११ वा १२ जून रोजी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आता हा ई-लिलाव लांबणीवर पडला आहे. ई-लिलावासाठी अनामत रक्कमेसह अंदाजे ५५० अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे हे ५५० अर्जदार प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. ई-लिलावपूर्व प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर मंडळाने या दुकानांचा मंगळवार, दि. ११ जून किंवा बुधवार १२ जून रोजी ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. येत्या दोन दिवसात हा लिलाव पार पडण्याची शक्यता म्हाडाने वर्तविली आहे.
म्हाडाच्या गृहप्रकल्पात काही दुकानांसाठीच्या गाळ्यांची बांधणी करणे बंधनकारक असते. या दुकानांची विक्री संबंधित विभागीय मंडळामार्फत ई-लिलाव पद्धतीने केली जाते. यासाठी अर्ज मागविण्यात येतात आणि म्हाडाच्या मुंबईमंडळाकडून एक बोली निश्चित केली जाते, या बोलीपेक्षा अधिक बोली लावणाऱ्या अर्जदाराला दुकान वितरित केले जाते. त्यानुसार मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई-लिलावासाठी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध केली होती. १ मार्चपासून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीला सुरुवात करण्यात आली होती. आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीनुसार ५ जून रोजी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीची मुदत अखेर संपुष्टात आली.