कोण शेफारलं यावर योग्यवेळी बोलेन : नाना पटोले

    12-Jun-2024
Total Views |
 
Nana Patole
 
मुंबई : कोण शेफारलं आहे यावर मी योग्यवेळी बोलेन, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांना दिले आहे. दोन जागा जास्त मिळाल्याने शेफारून जाऊ नये, असे वक्तव्य संजय राऊतांनी नाना पटोलेंचे नाव न घेता केले होते. यावर आता पटोलेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नाना पटोले म्हणाले की, "लोकसभेत मेरिटप्रमाणे जागावाटप झालं असतं तर यापेक्षाही चांगल्या जागा निवडून आल्या असत्या. शेफारलं कोण आहे, यावर मी योग्य वेळ आल्यावर प्रतिक्रिया देईल. पण येणाऱ्या विधानसभेमध्येसुद्धा मेरिटच्या आधारावर निर्णय घ्यावा, असा आमचा त्यांना सल्ला आहे. आम्ही लहान मोठं असं काहीही केलेलं नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. त्यामुळे अशा प्रकारे असंवैधानिक शब्दांचा त्यांनी वापर करु नये," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "ठाकरेंनी पाकिस्तानच्या झेंड्यासमोर..."; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
 
संजय राऊत काय म्हणाले?
  
"महाविकास आघाडीत छोटा मोठा भाऊ असं काहीही नाही. आम्ही एकमेकांच्या मदतीने लोकसभेच्या जागा जिंकलो आहोत. या निवडणूकीत सगळ्यात जास्त संघर्ष आमच्या वाट्याला आला होता. आम्हीसुद्धा मोठ्या मनाने स्वत:ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारात झोकून दिलं होतं. त्यामुळे दोन जागा कोणाला जास्त मिळाल्या तर त्या मविआला मिळाल्या असं आम्ही म्हणतो. आम्हाला चार जागा जास्त मिळाल्या असत्या तर आम्ही असं शेफारून बोललो नसतो. यात सगळ्यांची मेहनत आहे," असे ते म्हणाले.