जम्मू-काश्मीरमध्ये ७२ तासात तिसरा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराच्या कारवाईत एक दहशतवादी ठार

    12-Jun-2024
Total Views |
 Doda
 
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी डोडा येथील सुरक्षा दलाच्या तात्पुरत्या तळावर गोळीबार केला आहे. दि. ९ जून २०२४ नंतर झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. हा हल्ला करून दहशतवादी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. बुधवार, दि. १२ जून २०२४ सकाळी हा हल्ला झाला. एक दिवस अगोदर, दि. ११ जून (मंगळवारी) दहशतवाद्यांनी कठुआ भागातील एका गावात घुसून काही गावकऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला होता.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय लष्कराने डोडा जिल्ह्यातील चत्तरगाला येथे तात्पुरता तळ तयार केला आहे. येथे पोलिसांसह राष्ट्रीय रायफल्सनेही चौकी उभारली आहे. ११-१२ जूनच्या रात्री काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी या तळावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. लष्कराकडून प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आल्यावर दहशतवादी पळून गेले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात सखोल तपासणी मोहीम राबवली जात आहे.
  
या गोळीबारात लष्कराचे पाच जवान आणि एक विशेष पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात किती दहशतवादी सामील होते याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
 
याआधी मंगळवारी दि. ११ जून रात्री जम्मूच्या कठुआमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. येथील हिरानगर भागातील सैदा सुखल गावात रात्री तीन दहशतवादी घुसले. एका घरावर दार ठोठावून पाणी मागितले. लोकांनी घरे न उघडल्याने आवाज करू लागले. आवाज ऐकून सुरक्षा दल तेथे पोहोचले. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. एका दहशतवाद्याने ग्रेनेड फेकण्याचाही प्रयत्न केला. प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 
दोन दहशतवादी अजूनही लपून बसल्याचे सांगण्यात येत असून सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू आहे. या चकमकीसंदर्भात अनेक दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमध्ये दहशतवादी हल्ल्यात काही गावकऱ्यांचा मृत्यू झाल्यासारख्या गोष्टी प्रमुख आहेत. पोलिसांनी हे व्हायरल मेसेज निराधार असल्याचे म्हटले आहे. सर्व गावकरी सुरक्षित असल्याचा दावा जम्मू पोलिसांच्या एडीजीपींनी केला आहे. सध्या चकमक सुरूच आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि सर्व महत्त्वाच्या लोकांच्या संपर्कात आहेत.
 
उल्लेखनीय आहे की, यापूर्वी ९ जून (रविवार) जम्मूमध्ये मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या दहशतवादी हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला रियासी जिल्ह्यात झाला. बसवर झालेल्या गोळीबारामुळे बसचा अपघात होऊन ती खड्ड्यात पडली.