मुंबई : पंचायत या वेब सीरीजचे चाहते सर्व वयोगटातील प्रेक्षक आहेत असे म्हटल्यास काहीही चुकीचे ठरणार नाही. पंचायत या वेब सीरीजच्या आधीच्या २ सीझनला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्यानंतर आता ‘पंचायत ३’ प्रदर्शित झाला आहे. या सीरीजमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांवर भूरळ पाडत आहे. पण यातील अम्माजी हे पात्रो या पर्वात विशेष लक्ष वेधून घेणारं ठरलं आहे. सरकारी योजनेतून घर मिळावं यासाठी ज्याप्रकारे अम्माजी अभिनय करतात, ते पाहून अनेकांनी टाळ्या शिट्ट्या नक्कीच वाजवल्या. अम्माजीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री आभा शर्मा यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात.
ज्येष्ठ अभिनेत्री आभा शर्मा यांनी चक्क वयाच्या ५४ व्या वर्षी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेत्री म्हणून ओळख असावी असे त्यांना कायम वाटत होते पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. पण तुम्हाला माहित आहे का आभा शर्मा या कवी आणि विचारवंत रामविलास शर्मा यांच्या पुतणी आहेत. दरम्यान, पंचायतच्या निमित्ताने ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ७५ वर्षींय आभा शर्मां यांनी त्यांचा प्रवास सांगितला.
आभा म्हणाल्या की, “मला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. पण, माझ्या आईला हे मान्य नव्हतं. तिला हे प्रोफेशन आवडत नव्हतं आणि मला तिच्या इच्छेविरुद्ध जायचं नव्हतं. माझं कुटुंब सुशिक्षित असलं तरी ते थोडं सनातनी होतं. माझ्या आईच्या निधनानंतर मी पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले आणि यावेळी मला माझ्या भावंडांचा पाठिंबा होता,” असं आभा शर्मा म्हणाल्या.
आभा कुटुंबातील शेंडफळ. त्यांचं कुटुंबं दिल्ली आणि हैदराबादमध्ये स्थायिक आहेत वडिलांच्या मृत्यूनंतर आभा शर्मा आपल्या आजारी आईची काळजी घेत होत्या. आणि यामुळेच त्यांनी लग्नही केलं नाही. कलाकार व्हायची इच्छा असल्याकारणाने त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून डिप्लोमा पदवी मिळवल्यानंतर १९७९ मध्ये शाळेत शिकवणी सुरू केली. त्यांचा जीवनप्रवास तसा फार खडतर होता. वयाच्या ३५ व्या वर्षी हिरड्यांमध्ये संसर्ग झाल्यामुळे त्यांनी आपले सर्व दात गमावले. पण तरीही जिद्दीने त्या नोकरी करत राहिल्या. त्यानंतर ४५ व्या वर्षी त्यांना आणखी एक दुर्मिळ आजार जडला, ज्यामुळे त्यांचे हातपाय थरथर कापत होते.
यासगळ्यामुळे त्यांनी १९९१ मध्ये त्यांनी शाळेत शिकवणं सोडलं आणि कालांतराने २००८ मध्ये आभा यांनी लखनऊमध्ये थिएटर करण्यास सुरुवात केली. हे त्यांनी कलाकार होण्यासाठी उचललेलं पाऊल होतं. पण त्या फारशा नाटकांमध्ये भाग घेऊ शकल्या नाही. काही काळाने बँक ऑफ बडोदाच्या एका जाहिरातीतून त्यांच्या मुंबईतील अभिनय करिअरला सुरुवात झाली. मात्र प्रकृतीमुळे त्यांनी ‘पिपली लाइव्ह’ व इतर काही सिनेमांच्या ऑफर सोडल्या.
करोनानंतर आभा यांची भेट अनुराग शुक्लाशी झाली. अनुराग लखनऊमध्ये त्यांचे भाडेकरू आहेत. त्यांनी आभा यांना पंचायतमधील एका भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. व्हिडीओ पाहिल्यानंतर पंचायतमधील अम्माजीची भूमिका त्यांना मिळाली. पंचायतच्या सेटवरील अनुभव सांगताना आभा म्हणाल्या, “मी सीरिजबद्दल थोडी साशंक होते, पण सेटवर पोहोचल्यानंतर सगळ्या शंका दूर झाल्या. सर्व सहकलाकार, दिग्दर्शक, मेकअपमन सर्वांनी खूप मदत केली”. दरम्यान, लवकरच आभा शर्मा ‘दुर्गा प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटातही दिसणार आहेत.