‘इंडी’ आघाडीस मिळणार २९५हून अधिक जागा – खर्गेंचा दावा
01-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली : काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीस २९५ हून अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान शनिवारी संपले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खर्गे म्हणाले, ‘इंडी’ आघाडीस यावेळी कमीत कमी २९५ आणि त्याहून जास्त जागांवर विजय मिळणार आहे. आघाडीतील सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या अंदाजानुसार हा आकडा काढला असून ‘इंडी’ आघाडीस निवडणुकीमध्ये मोठे यश मिळणार असल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे भाजपला २२० तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीस (रालोआ) २३५ जागा मिळणार आहेत, असाही दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
बैठकीस काँग्रेस नेत्या सोनिया, राहुल गांधी, प्रियांका गांधी – वाड्रा, के. सी. वेणुगोपाल, सपाचे अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव, शरद पवार, जितेंद्र आव्हाड, आपचे अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि राघव चढ्ढा, द्रमुकचे टी. आर. बालू, राजदचे तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, भाकपचे डी. राजा, माकपचे सिताराम येचुरी, शिवसेना उबाठाचे अनिल देसाई आदी नेते उपस्थित होते.