मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी-सीव्होटर च्या सर्व्हेनुसार राज्यात महायुती व मविआ यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. भाजपला १७ जागा, शिवसेना शिंदे गटाला ०६ जागा तर उबाठा गटाला ०९ जागा, शरद पवार गटाला ०६ जागा व काँग्रेसला राज्यात ०८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपकडून यंदा लोकसभा निवडणुकीकरिता दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळाले. भाजप, शिंदे शिवसेना गट व अजित पवार गट यांच्या महायुतीने राज्यात लोकसभा निवडणुकीला जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच, महायुतीच्या जागावाटपात भाजपने २८ जागा तर शिवसेना शिंदे गटाला १५ जागा मिळाल्या असून अजित पवारांना केवळ ०४ जागांवरच समाधान मानावे लागले होते.
दरम्यान, अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले असून येत्या ४ जूनला निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालाचा अंदाज समोर येणार आहे. सायंकाळी ६:३० नंतर एक्झिट पोल स्पष्ट होतील. त्यानुसार, लवकरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. एनडीए विरुध्द इंडी आघाडी यांच्यात नेमकी बाजी कोण मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.