दोडामार्गमधून चतुराच्या नव्या प्रजातीचा शोध; दुर्मीळ कान्हळाच्या रायीच्या परिसरात वावर
07-May-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी): सिंधुदुर्गातील तिलारीच्या खोऱ्यातून चतुराच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (maharashtra myristica swamp). या प्रजातीचे नामकरण 'मॅक्रोमिआ कान्हाराईंसिस', असे करण्यात आले असून मराठीत तिचे नाव 'राय भिंगरी' ठेवण्यात आले आहे (maharashtra myristica swamp). दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे गावातील दुर्मीळ 'मायरेस्टिका स्वॅम्प' परिसरातून या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. (maharashtra myristica swamp)
नव्याने शोधण्यात आलेल्या राय भिंगरी या चतुरावरील शोधाचे वृत्त सोमवार दि. ६ मे रोजी झूटॅक्सा या आंतराराष्ट्रीय नियतकालीकामध्ये प्रकाशित झाले. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथील प्राध्यापक डॉ. योगेश कोळी, बॅ. नाथ पै ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथील सहाय्यक शिक्षक तथा संशोधक अक्षय दळवी आणि दोडामार्ग तालुक्यातील राहुल ठाकूर यांनी या प्रजातीचा उलगडा केला आहे. ही प्रजात गेल्यावर्षी जून २०२३ रोजी बांबर्डे भागात सापडली होती. ही प्रजात त्याच्या कुटुंबातील इतर प्रजातींपेक्षा थोडी वेगळी वाटल्याने त्यावर अधिक संशोधन सुरु झाले. अभ्यासाअंती ही प्रजात त्याच्या तोंडावरील रंगछटा, शेपटीच्या टोकाचा आकार आणि प्रजनन इंद्रिये यावरुन निश्चितच वेगळी असल्याचे आढळून आले. बांबर्डे गावातील 'मायरेस्टिका स्वॅम्प'चा परिसर कान्हाळाची राई म्हणून ओळखला जातो. ही राई गेली कित्येक वर्षे देवराई म्हणून संवर्धित करण्यात आली आहे. या परिसराला जैवविविधता वारसा स्थळचा दर्जा देखील देण्यात आला आहे. नव्याने शोधलेली प्रजात कान्हळाच्या राईच्या परिसरातच आढळल्याने तिचे नामकरण 'मॅक्रोमिआ कान्हाराईंसिस' आणि मराठी नामकरण 'राय भिंगरी', असे करण्यात आले आहे. या देवराईच्या अगदी जवळूनच तिलारी नदी वाहते. त्यामुळे या प्रजातीचे इंग्रजीमधील सर्वसामान्य नाव 'तिलारी क्रूझर', असे करण्यात आले आहे.
एका बाजूला देवराईचा परिसर आणि दुसऱ्या बाजूला असणाऱ्या भाताशेतीच्या मधून वाहणाऱ्या उथळ झऱ्यांमध्ये ही नवी प्रजात अधिवास करते. 'मॅक्रोमिआ' जातीतील चतुरांच्या भारतात १४ प्रजाती सापडतात. त्यापैकी आत्तापर्यंत नऊ प्रजाती या पश्चिम घाटामध्ये आढळतात. त्यात आता आणखी एका प्रजातीची भर पडली आहे. पश्चिम घाटातील नऊ प्रजातींसोबत दक्षिण पूर्व आशियामधील जवळपास १० प्रजातींचाही या संशोधनादरम्यान अभ्यास करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा पश्चिम घाटातील जैवविविधता अधोरेखित झाली असून या अभ्यासामुळे सह्याद्रीतील देवरायांनाही एक वेगळी ओळख मिळण्यास मदत झाली आहे. या परिसरात बारमाही वाहणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांमध्ये या प्रजातीचा वावर असल्याने हे नैसर्गिक स्त्रोत अबाधित राहणे हे प्रजातीचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी अतिशय आवश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत ही प्रजात फक्त बांबर्डे गावामधील कान्हळाच्या राईच्या परिसरात दिसत आहे.