राममंदिराला भेट दिल्याने त्यांनी मला टॉर्चर केले...राधिका खेडा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपमध्ये प्रवेश!
07-May-2024
Total Views | 81
रायपूर : काँग्रेसच्या माजी महिला नेत्या राधिका खेडा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनीही भाजपचे सदस्यत्व स्विकारले आहे. तसेच राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.
राधिका खेडा म्हणाल्या की, “सर्वांना माझा जय श्री राम! मला काँग्रेसमध्ये सनातनी आणि हिंदू म्हणून शिक्षा भोगावी लागली. आजची काँग्रेस ही राम आणि हिंदूविरोधी आहे. मला संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा यांचे आभार मानते. राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची ही एक संधी आहे.”, असे त्या म्हणाल्या आहेत.
त्या म्हणाल्या, “छत्तीसगडमध्ये मोदीजींच्या गॅरेंटीचे सरकार आहे. ज्यांच्या संरक्षणात मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. अन्यथा, रामभक्त असल्याने, रामललाचे दर्शन घेतल्यामुळे कौशल्या मातेच्या भूमीत माझ्यावर अन्याय झाला. ज्या पद्धतीने माझ्यावर अन्याय झाला. काँग्रेस पक्षात मला हिंदू, सनातनी आणि रामभक्त म्हणून शिक्षा झाली. आज मी हे सर्व सांगताना ही थरथरत आहे.”
दरम्यान पक्षप्रवेशानंतर अभिनेते शेखर सुमन म्हणाले, “कालपर्यंत मला माहित नव्हते की मी आज इथे असेन कारण आयुष्यात अनेक गोष्टी नकळत घडतात. काहीवेळा तुमचे भविष्य काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती नसते. त्यामुळे आता वरिष्ठांकडून दिल्या जाणाऱ्या आदेशाचे मी पालन करेन. मी भाजपात खूप सकारात्मक विचार घेऊन आलो आहे. सर्वप्रथम, मला येथे येण्याची आज्ञा दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानू इच्छितो. ”
काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर राधिका खेडा यांनी छत्तीसगड काँग्रेसच्या काही नेत्यांवर आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. छत्तीसगडचे काँग्रेस नेते सुशील आनंद आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांबाबत त्यांनी सांगितले आहे की, या लोकांनी रायपूर कार्यालयात त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. एवढेच नाही तर 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान त्या कोणत्या हॉटेलच्या खोलीत राहतात आणि तुम्हाला कोणती दारू प्यायला पाठवायची, अशी विचारणाही करण्यात आली, असा आरोप ही त्यांनी केला.