नवी दिल्ली : चीनमध्ये एका माथेफिरू व्यक्तीने हातात चाकू घेऊन रुग्णालयात हत्याकांड घडवून आणले. या हल्ल्यात २३ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे. या घटनेला चिनी माध्यमांनीही दुजोरा दिला आहे. हा हल्ला दि.७ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला.
चीनची सरकारी वृत्तसंस्थेने या घटनेत किमान १० जण ठार किंवा गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दिली होती. तसेच स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीत सांगण्यात आले आहे की, या घटनेत २३ लोकांना लक्ष्य करण्यात आले होते, त्यापैकी २ मरण पावले, त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनच्या दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या युनान प्रांतात हा हल्ला झाला. युनान प्रांत लाओस, म्यानमार आणि व्हिएतनामच्या सीमा सामायिक करतो. हा प्रांत चीनमधील सर्वात गरीब प्रांतांमध्ये गणला जातो. येथून वाहणाऱ्या मेकाँग नदीच्या माध्यमातून चीन आणि शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी होते आणि अंमली पदार्थांच्या प्रसारासाठी हा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, युनान प्रांतातील झेंक्सिओंग काउंटीमधील एका रुग्णालयात ही घटना घडली आहे. सरकारी न्यूज साइट द पेपरने हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये काठी धरलेल्या दुसऱ्या माणसाकडे चाकू धरलेल्या व्यक्तीचे फोटो तसेच घटनास्थळी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो प्रकाशित केले. चीनमध्ये शस्त्रांवर कडक बंदी आहे. त्यामुळे गुन्हेगार बंदुकीऐवजी गुन्ह्यांसाठी चाकूचा वापर करताना दिसत आहेत. ज्यामुळे गेल्या काही वर्षांत चीनमध्ये चाकू हल्ल्याद्वारे झालेल्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.