“जेव्हा खुद्द Amitabh Bachchan म्हणतात मलाही घर चालवावं लागतं...”, अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा
07-May-2024
Total Views |
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा ५०-६० दशकाचा काळ गाजवणारे अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना बहाल केले. मराठीतील या जोडीने अनेक सदाहाबर गाणी देखील देऊ केली. याशिवाय त्यांनी अजिंक्य देव यांच्या रुपात एक उत्तम नट देखील मनोरंजनसृष्टीला दिला. नुकतीच अजिंक्य देव यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा With कलाकार या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल त्यांनी सांगितले.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘वासुदेव बळवंत फडके’ या चित्रपटात अजिंक्य देव यांनी फडके यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा आमि अमिताभ बच्चन यांचा विशेष किस्सा सांगताना ते म्हणाले, “वासुदेव बळवंत फडके या मराठी चित्रपटासाठी अभिनेते विक्रम गोखले यांनी व्हॉईस ऑव्हर दिला होता. आणि हिंदीत ज्यावेळी आम्ही शेमारुला तो विकला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडून हिंदीत व्हॉईस ऑव्हर करुन घ्या. वडिल म्हणाले करुन घेतो. मग बाबा अमिताभ बच्चन यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं काय काम आहे. ते म्हणाले करुयात. ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं ते सकाळी ६ वाजता स्टुडिओत आले आणि म्हणाले की मी तासाभरात काम संपवून निघेन कारण मला आणखी काम आहे. सर्व नीट रेकॉर्ड झालं. त्यानंतर बच्चन साहेब आम्हाला म्हणाले की रमेशजी मला वाटलं नव्हतं की मराठी चित्रपट असेही बनतात. मला हा चित्रपट पाहायचा आहे. असं म्हणून त्यांना तासाभरात निघायचं होतं त्या बच्चन साहेबांनी ३ तास बसून वासुदेव बळवंत फडके हा चित्रपट पुर्ण पाहिला आणि आमचं कौतुक देखील केलं,”असा अमिताभ बच्चन यांचा त्यांच्या कामाविषयीच्या आस्थेचा किस्सा अजिंक्य देव यांनी सांगितला.
पुढे ते म्हणाले की, “काही दिवसांनी मी बाबांसोबत अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर त्यांचे आभार मानन्यासाठी गेलो. त्यावेळी गमतीत बाबा बच्चन साहेबांना म्हणाले की, आता अजून किती कामं करणार तुम्ही बच्चन साहेब. थांबा आता. यावर अमिताभ बच्चन यांनी माझ्या बाबांकडे पाहिले आणि ते म्हणाले की रमेशजी मुझे भी घर चलाना पडता है”, ही वाक्य ज्यावेळी मी अमिताभ बच्चन यांच्या तोंडून ऐकली त्यावेळी माझ्या डोक्यात हा विचार आला की जर हा माणूस इतके यश मिळवल्यानंतर असं म्हणत असेल तर आपणही सातत्याने कामं केली पाहिजे”.